लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर/खल्लार : भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर घाटावरील पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या चारपैकी एका युवकाचा मृतदेह शोधताना पिंजर येथील खाजगी बचाव पथकाची बोट डोहात उलटली. तथापि, अन्य पथकाच्या मदतीने त्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.गणेश विसर्जनादरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील चार जण बुडाले होते. पैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. मात्र, वाहून गेलेल्या सतीश सोळंके या तरुणाचा सहाव्या दिवशीही शोध लागू शकलेला नाही. मंगळवारी नागपूर येथील एसडीआरएफच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीला अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा संस्थेचे बचाव पथक तैनात होते. त्या पथकाचे नेतृत्व दीपक सदाफळे हे करीत होते. पूर्णा नदीच्या पुलाजवळ शुक्लेश्वर घाटावर मोठा डोह आहे. त्या डोहात शोधमोहीम सुरू होती. दुपारी ४ च्या सुमारास ती खासगी बोट उलटली. त्यातील पाचही जण नदीपत्रात पडले. एसडीआरएफने त्यांना बाहेर पडण्यास सहकार्य केले. मात्र, पट्टीचे पोहणारे असल्याने ते स्वत:च बाहेर निघाल्याची माहिती भातकुलीचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली.पथकप्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे, अंकुश दीपक सदाफळे, विक्की साटोटे, मयूर सळेदार, ऋषीकेश तायडे हे पाच जण सुखरूप आहेत. या बचाव पथकाने वाठोडा शुक्लेश्वरपासून १५ किमी अंतरावर पूर्णा नदी पिंजून काढली. जिल्हा आपत्ती निवारण पथकासह नागपूर व पिंजरचे पथक मृतदेह शोधण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.गौरखेडा येथील तरुणाचा मृतदेह शोधत असताना खासगी बचाव पथकाची बोट आकस्मिक उलटली. मात्र, पथकातील पाचही जण पट्टीचे पोहणारे असल्याने बाका प्रसंग टळला.- बळवंत अरखराव, तहसीलदार, भातकुली
बचाव पथकाची बोट उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:38 AM
डोहात शोधमोहीम सुरू होती. दुपारी ४ च्या सुमारास ती खासगी बोट उलटली. त्यातील पाचही जण नदीपत्रात पडले. एसडीआरएफने त्यांना बाहेर पडण्यास सहकार्य केले. मात्र, पट्टीचे पोहणारे असल्याने ते स्वत:च बाहेर निघाल्याची माहिती भातकुलीचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली.
ठळक मुद्देवाठोडा येथील घटना : पाचही जण सुखरूप