अमरावती : शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे येवदा व ऋणमोचन येथील नद्यांना आलेल्या पुरात दोघे वाहिल्याची घटना घडली. बचाव पथकाद्वारे सकाळपासून शोध सुरू आहे. संततधार पावसामुळे ऋणमोचन येथील पूर्णा नदीत इर्शाद बेग शहादत बेग हा ३० वर्षीय तरुण वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला भातकुली येथील नगरसेवक तमीझ पठाण यांनी दिली. लागलीच या ठिकाणी जिल्ह्याचे शोध व बचाव पथकाची १४ सदस्यीय टीम रवाना झाली. तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली.
येवद्यात शेतमजूर गेला वाहूनदर्यापूर तालुक्यातील येवदा येथे शेतात कामाला निघालेला शेतमजूर राहुल गणेश चांदूरकर (२८) हा शहानूर नदी पार करीत असताना शनिवारी सकाळी पाय घसरल्याने प्रवाहात वाहून गेला. त्याचा अद्यापही शोध लागला नाही. त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता एनडीआरएफ पथक दाखल झाले. पंधरा दिवसांपासून सतत पावसामुळे शहानूर धरणाची पातळी वाढल्यामुळे काल मध्यरात्री धरणाची तीन दरवाजे उघडली. शहानूर नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. याशिवाय येवदाजवळील कातखेडा गावालगतचा मातीचा बंधारा फुटून वाहिलेले पाणी येवदा गावात शिरल्याने रामनगर, माळीपुरा, खाटीकपुरा, पेठपुरा, आठवडी बाजारापर्यंत प्अनेक घरांमध्ये पाणी शिरले. १९९८, २००६, २०१२, २०१३, २०१४ मध्येदेखील गावात पाणी शिरले होते. दरम्यान, घटनास्थळी नायब तहसीलदार गाडे, सरपंच प्रदीप देशमुख, मंडळ अधिकारी बोंद्रे, तलाठी डोळे, कासरकर, रायबोले, कातखेड येथील पोलीस पाटील रायबोले उपस्थित झाले होते. सायंकाळपर्यंत मृतदेह रेस्क्यू पथकाला गवसला नव्हता.