लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. या प्रकल्पात प्रतिबंधक, समस्या निराकरणाशी संबंधित उपायांचा अंतर्भाव आहे.विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ‘कुमारी माता’ ही एक गंभीर समस्या आहे. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. विशेषत: झरी-जामनी या तालुक्यात या समस्येचे प्रमाण अधिक आहे. या भागातील कोलाम आदिवासी जमातीशी ही समस्या निगडित आहे. त्यामुळे या संशोधनात झरी-जामनी परिसर निवडण्यात आला. प्रकल्प संचालक डॉ.वैशाली गुडधे व प्रकल्प सहायक म्हणून वैभव अर्मळ यांनी कार्य केले. या संशोधनात झरी-जामनी परिसरातील कुमारी मातांच्या पार्श्वभूमीचे अध्ययन करून त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचे अध्ययन करण्यात आलेले आहे. शिवाय कुमारी मातांच्या समस्या निदर्शनास आणून त्या सबंधित समस्यामागील मूळ कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही समस्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभावकुमारी माता या विषयाकडे आदिवासी समुदाय आणि ग्रामीण व नागरी समुदाय अशा दोन्ही समुदायांमध्ये बघण्याची दृष्टी भिन्न आहे. ही भिन्नता या समुदायातील स्त्री-पुरुष दर्जानुसार व लैंगिक नीतीनुसार निर्माण झाली आहे. आदिवासी समुदायात अलीकडच्या काळात या विषयाला समस्या म्हणून बघितले जाऊ लागले आहे. कुमारी माता होण्यामागे सांस्कृतिक प्रभावाचा अंशत: प्रभाव असला तरी निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभाव व त्यामुळे आलेली विकास वंचितता, शारीरिक संबंधाबाबत योग्य माहितीचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव ही मुख्य कारणे आढळून आली.संशोधनातून प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशींमुळे ही समस्या सोडवण्यास लाभ होणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक परिसरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्था यांनाही ही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
कुमारी मातांवरील संशोधन प्रकल्प राज्य महिला आयोगाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:29 AM
राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला.
ठळक मुद्देसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पुढाकार आयोगाचे प्रकल्पास अर्थसहाय्य