अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळा, अनुदानित आश्रमश्रशाळा, शासकीय वसतिगृह आणि नामांकित शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग सुरू हाेणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
इयत्ता नववी ते बारावीपर्यंत २३ नोव्हेंबर २०२० पासून वर्ग सुरू झाले असले तरी आदिवासी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी फारसा उत्साह दाखविला नाही. त्यामुळे आश्रमशाळा सुरू होऊनही नववी ते बारावीच्या वर्गात अत्यल्प पटसंख्या दिसून आली. अमरावती जिल्ह्यात आश्रमशाळा सुरू झाला, मात्र विद्यार्थीच नाही, असे चित्र आहे. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश जारी झाल्यामुळे ‘ट्रायबल’चा शिक्षण विभागापुढे कोरोना नियमावलींचे पालन करून निवासी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांपुढे अध्यापन करणे आव्हानात्मक ठरणारे आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे. अमरावती एटीसी अंतर्गत ‘नामांकित’ ४५ शाळादेखील सुरू होणार आहे.
-----------------
अशा कराव्या लागेल शाळांना उपाययोजना
- शाळा, वसतिगृहात स्वच्छता व निर्जंतुकीकरण
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
- शिक्षक, अधीक्षक, गृहपाल, विद्यार्थी व इतर भागधारकांचे कार्यगट
- वर्गखोली, स्टाफ रूममधील बैठक व्यवस्थेत सहा फुटांचे शारीरिक अंतर
- मास्कचा वापर, थर्मल स्क्रीनिंगने तपासणी, हॅन्डवॉशची व्यवस्था
- शाळा, वसतिगहातील परिपाठ, समारंभ, स्नेहसंमेलनास मनाई
- विद्यार्थ्यांना शाळेत, वसतिगृहात उपस्थितीसाठी पालकांचे संमतिपत्र
- विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधीक्षक, गृहपाल कोविड-१९ बाबत दक्ष
- जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत
- शाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतर वर्गखाेल्यांचे निर्जंतुकीकरण
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक, सामाजिक कल्याण
----------------
अमरावती एटीसी अंतर्गत वसतिगृहांची संख्या
प्रकल्प शासकीय आश्रमशाळा वसतिगृह
धारणी - १७ १८
पांढरकवडा - २८ १९
किनवट - २१ १५
अकोला - १९ १५
औरंगाबाद - ०६ १४
पुसद - १२ ११
कळमनुरी - ०९ ११
----------------------------------
कोट
शासननिर्देशांप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून कोराेना नियमावलींचे पालन करून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. यात निवासी शाळा, आश्रमशाळा, एकलव्य स्कूल, इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांचा समावेश असणार आहे.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.