अमरावती : चोरांचे ‘मिशन राजा पेठ’ सुरू आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत भुरट्यांनी त्या भागातील रहिवाशांची घरे दिवसाढवळ्या टार्गेट केली आहेत. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते ७.३० च्या सुमारास देशपांडे प्लॉट येथील एका शासकीय कर्मचाऱ्याच्या घरातून ९५.५० ग्रॅम सोन्याचे दागिने व १८ हजार रुपये रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी, राजा पेठ पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी अज्ञाताविरुद्ध दिवसा घरफोडीचा गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भिवापूरकरनगर येथून २०७.५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्या चोरीचा उलगडा झाला नसताना चोरांनी पुन्हा राजा पेठमध्येच डल्ला मारला आहे.
देशपांडे प्लॉट येथील रहिवासी दिलीप तुळशीराम पवार (५८) हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास ते घराला कुलूप लावून पितृमोक्ष अमावास्येनिमित्त वडिलांना पान टाकण्यासाठी कुटुंबासह मूळ गावी चंडिकापूर येथे गेले होते. सायंकाळी ७.३० च्या सुमारास ते परतले असता मेन गेटचे लॉक उघडून ते घराचा मुख्य दरवाजा उघडायला गेले असता तेथे केवळ कडी लावलेली दिसली. तर कुलूप आतील सोफ्यावर दिसून आले. लाईट, पंखे देखील सुरूच होते. तर, ज्या डबीत पवार यांच्या पत्नीचे सोन्याची दागिने होते, त्या डब्या सोफ्यावर दिसून आल्या. त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बनावट चावीने उघडले कुलूप
बेडरूममधील एक आलमारी फोडलेली तर दुसरी आलमारी बनावट चावीने उघडल्याचे पवार यांच्या लक्षात आले. चोराने त्यांच्या घरातून ३२ ग्रॅमचे सोन्याचे दोन गोफ, २५ ग्रॅमचा सोन्याचा चपलाहार, सोन्याची अंगठी, कानातले, मंगळसूत्र, सोन्याचा हार असे एकूण ९५.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोराने दागिन्यांसह १८ हजार रुपये रोखदेखील चोरून नेली. ते लक्षात येताच पवार यांनी लागलीच राजा पेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणेदारांसह पोलीस पथक तातडीने पोहोचले. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले.