बेनोडा (शहीद) : आधीच मंजूर असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम तत्काळ सुरू करण्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्यावतीने वरूड येथील केदार चौकात १२ जुलै रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. यावर आश्वासन देऊनही काम सुरू न केल्याने अखे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा तालुकाध्यक्षाकडे दिला.
वरूड तालुका संभाजी ब्रिगेडने पूर्ण ताकदीनिशी पाठिंबासुद्धा दिलेला होता. परंतु, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नगर परिषद कार्यालयाकडून ते मंजूर झालेले काम एका महिन्याच्या आत सुरू करण्याचे लेखी ठोस आश्वासन दिल्यामुळे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, दिलेली तारीख व वेळ जवळ येऊनही नगर परिषदेकडून त्या कामाबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्यामुळे आठ दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्यावतीने नगर परिषदेला आश्वासनांची आठवण करून देण्याकरिता स्मरणपत्र दिले. त्या स्मरणपत्रानुसार संभाजी ब्रिगेडच्यावतीने २० ऑगस्टपासून वरूड नगर परिषद कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, अद्यापही काम सुरू झालेले नाही किंवा तशा हालचालीही त्यांच्याकडून होताना दिसत नाही. तरीसुद्धा संभाजी ब्रिगेडने या महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करण्याबाबत याअगोदर जी आक्रमक भूमिका घेतली, तीच भूमिका ठिय्या आंदोलनाबाबत दिसत नाही. एकदम मवाळ होऊन दोन पाऊल मागे कशासाठी, असा आक्षेप घेऊन वरूड तालुका संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संदीप उईके, तालुका उपाध्यक्ष गोपाल नांदूरकर, सचिव चंद्रशेखर अडलक, सहसचिव संजय गोडबोले, महेश बोरकुटे आदींनी तालुकाध्यक्ष मनोज गेडाम यांच्याकडे सामूहिक राजिनामा सोपविला आहे.