ड यादी चा मुद्दा गाजला
धामणगाव रेल्वे : सन २०११ च्या जनगणना सर्वेक्षणाच्या वेळी टीव्ही, फ्रीज, दुचाकी बाळगत असल्याचे सांगितल्याने ‘ड’ यादीतील लाभार्थींची दोन हजार घरकुले रद्द करण्यात आली. लाभार्थींची रद्द न करता गरजूंना तात्काळ घरकुल द्यावे, या मागणीचे तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती ग्रामसभेत ठराव घेऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविणार आहेत. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत सरपंचांच्या सभेत ‘ड’ यादीचा मुद्दा गाजला.
घरी टीव्ही, फ्रीज, दुचाकी, चारचाकी शेती असल्याची माहिती सन २०११ च्या जनगणनेच्या वेळी घेण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील दोन हजार घरकुले रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील सर्व सरपंचांची सभा पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. पंचायत समितीचे सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, सदस्य शुभम भोंगे, राजकुमार केला, गटविकास अधिकारी माया वानखडे, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले यांची उपस्थिती होती. अनेक वर्षापासून कैक कुटुंबांना घरे नाहीत. अशावेळी ‘ड’ यादीतील गरजूंची नावे रद्द होणे अन्यायकारक असल्याचे मत या सरपंचांनी व्यक्त केले. ‘ब’ यादी अद्यापही पूर्ण झाली नाही. अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले.
आगामी काळात सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन हा ‘ड’ यादीतील नावे रद्द करू नये, असा ठराव राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविण्याचे एकमताने बैठकीत ठरविण्यात आले. गावातील गरजूंची घरकुल यादी तयार करण्याचा अधिकार ग्रामसभेला द्यावा तसेच ई-क्लास जागा उपलब्ध करून द्यावी. अनेक कुटुंब विभक्त आहे. त्यातील गरजूंना घरे नाहीत. त्यासाठी शासन स्तरावर त्वरित उपाययोजना राबविण्यात यावे, अशी मागणीही या सरपंचांनी बैठकीत केली. ग्रामविकासासाठी सरपंचांची भूमिका व्यापक व्हावी व कृती समिती तयार करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. संचालन विशाल सुटे व आभार प्रदर्शन जळगावचे सरपंच मनोज शिवणकर यांनी केले.
-------------------
आयएसओकडे करा वाटचाल
हिंगणगाव, मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत आयएसओचा दर्जा मिळाल्याने इतर ग्रामपंचायतीने ही पुढाकार घ्यावा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सहकार्य करावे, आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी केले.