अमरावती : विभागातील नवसंशोधक तसेच नवउद्योजक तणांना आपल्या कल्पनेतील नवनवीन संकल्पनांना बळ देऊन त्यांच्या नव्या स्वरूपाच्या स्टार्टअपसाठी सहकार्य करण्याच्या उद्देश्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात इनक्युबेशन सेंटरची उभारणी केली आहे. या केंद्राला सर्वोत्तम केंद्र बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी केले.
विद्यापीठात नव्याने निर्माण झालेल्या इनक्युबेशन सेंटरला कुलगुरू डॉ. भाले यांनी भेट देऊन सेंटरची पाहणी केली. यावेळी इनक्युबेशन सेंटरसाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रशासकीय सहकार्य करून या सेंटरला बळ देण्यासाठी पुढाकार घेऊन असेही ते म्हणाले. माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या संकल्पनेतून निर्मित या इनक्युबेशन केंद्राच्या माध्यमातून अनेक तरूणांनी आपले स्टार्टअप्स उभे केले असून अनेकांचे व्यवसाय मोठ्या स्वरूपात तयार झालेले आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून कित्येक तरूणांचे नवनवीन प्रोजेक्ट आणि संकल्पनांना बळ येऊन ते उद्योजकतेच्या दिशेने मार्गस्थ झालेले असल्याची माहिती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डी.टी.इंगोले यांनी यावेळी दिली.
--------------
४० लाखांचा निधी प्राप्त
या केंद्रासाठी ५ कोटींचा निधी देखील शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४० लाखांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या इमारतीत हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी तसेच तरूणांना उद्योग उभारणीसाठी चांगल्या उद्योजकांचा अभिप्राय तसेच मार्गदर्शन मिळणार आहे. सोबतच बाजाराचे संशोधन, गुंतवणूक, पोर्टफोलिओ संसाधन, सेवा अशा विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.