राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घराचा व पुनर्वसनचा प्रश्न शासनाने अद्याप निकाली न काढल्याने अखेर हातुर्णा येथील नागरिकांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त करून आंदोलक उग्र होण्याची शक्यता आहे. सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. यात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १६९ नागरिकांचे पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले. कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र ३० वर्षांपासून १६९ पुनर्वसित नागरिकांना पट्ट्यांचे वाटप रखडले. पट्टे न मिळाल्याने क्षतिग्रस्त घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले आहे. आज उद्याच्या आशेवर आतापर्यंत घराचे स्वप्न बघणाऱ्या गावकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींकडे गार्हाणे मांडले. निवेदने दिलीत. परंतु पट्टे मिळालेच नाही. अनेकांची घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे, तर कुणी भाड्याच्या घरात राहत आहेत. शेवटी आज त्या गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला व गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना पाच-सहा दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आंदोलक पाण्याच्या टाकीजवळ जमा झाले, काही नागरिक पाण्याच्या टाकीवर चढले. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळाल्यावरून नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली येण्यास तयार नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. या आंदोलनात १६९ पुनर्वसनग्रस्त व कुटुंबीय सहभागी होते. यावेळी बेनोडा शहीदचे ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांनी ताफ्यासह घस्तनास्थळ गाठले. वृत्तालिहिस्तोवर आंदोलक पाण्याच्या टाकीवरच होते. खाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला होता. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशीच चर्चा करणार, असा पवित्रा घेतला होता. यात विनोद ठाकरे, पंकज ठाकरे, हर्षल ठाकरे, मंगेश कोरडे, मनोहर रामटेके, नामदेव पेठे, सचिन पेठे, सारंग ठाकरे, जानराव चौधरी, दीपक पोहणे, सुरेश ठाकरे, दीपक ठाकरे, रामेश्वर अलोणे, श्रीराम घागरे, मधुकर गावंडे, सुनील गावंडे, शालिक धुर्वे, सुरेंद्र घाटोळे, सचिन पेठे, ज्योती गजानन ठाकरे, निर्मला चौधरी, कुसुम ठाकरे व ग्रामस्थ सहभागी होते.
आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदन दिले. विविध बैठका झाल्यात. मात्र प्रशासनाने प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता आम्ही न्याय्य हक्कासाठी आरपारची लढाई लढू.
- विनोद ठाकरे,
आंदोलक ग्रामवासी