मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आयसीएआय २०१६ फेस्टिवलचे उद्घाटनअमरावती : करमूल्यांकन व कर निर्धारण याव्यतिरिक्त देशातील उद्योग जगत स्वच्छ व पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी सनदी लेखापालांच्या खांद्यावर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सीए भवन येथील आयसीएआय फेस्टिवल २०१६ च्या उद्घाटनप्रसंगी केले. व्यासपीठावर पालकमंत्री प्रवण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, आ.सुनील देशमुख, रवी राणा, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, आयसीएआय अमरावतीचे अध्यक्ष ब्रिजेश फाफट, सीए चंद्रकांत कलोती, जुल्फेश शहा, विनोद तांबी, शैलेश लाठीया सी.ए. असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.नवीन वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात बगीच्याच्या भूमिपूजनाने झाली. या वर्षात निसर्गाची साथ मिळो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. करविषयक सर्व कायद्याचे पालन करण्याचा सल्ला देणारा लेखापाल हा उत्तम सनदी लेखापाल अशी व्याख्या करता येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अर्थव्यवस्थेच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. जगातील सर्व गुंतवणुकदारांचा ओघ भारताकडे येत असून त्यांना पारदर्शक पद्धतीद्वारे उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन देणे हे आवश्यक आहे. स्वच्छ उद्योग वातावरणांची निर्मिती करण्याची मोठी जबाबदारी लेखापालांकडे येते.आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या अहवालाचा दाखला देत भारत हा चीनपेक्षाही वेगाने विकास करणारा देश असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची लोकसंख्या हे भारताचे शक्तीस्थान असून २०२० मध्ये भारत सर्वात तरुण लोकसंख्येचा देश असेल. त्या आधारावर प्रशिक्षीत व कौशल्य विकसित मनुष्यबळ पुरवणारा भारत सुपर पॉवर असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.गुंतवणूक क्षेत्रात ४० लाख कोटींच्या गुंतवणूकीची क्षमता असलेल्या उद्योगजगतात उद्योगांना पूरक व स्वच्छ वातावरण निर्मितीची गरज आहे. आय.सी.ए.आय. ही संस्था कायद्याने स्थापित झाली असून उद्योजकांना कर्ज प्रस्तावापासून तर कर निर्धारणापर्यंत मदत करणारा, मार्गदर्शन करणारा सनदी लेखापाल हा उद्योजकाचा हात हातात घेणारा मित्र असतो, अशा शब्दात त्यांनी सी.ए. च्या कामाचे वर्णन केले.यावेळी आय.सी.ए.आय.च्या परिसरातील बगिच्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. आय.सी.ए.आय.च्या सर्व माजी अध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात आय.सी.ए.आय.चे अध्यक्ष ब्रिजेश फाफट यांनी अमरावती शाखेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संचलन सी.ए.लढ्ढा यांनी, तर आभार प्रदर्शन सी.ए. प्रवीण अग्रवाल यांनी केले.
उद्योगजगत पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM