अमरावती : नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटणाºया महिला पोलिसांना विश्रांतीची आवश्यकता असते. त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विश्राम कक्ष निर्माण करण्याचे ध्येय ठेवून कामकाज सुरु आहे. लवकरच सर्व ठाण्यांमध्ये महिलांचे विश्रांती कक्ष तयार होतील, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अमरावती शहरातील पहिल्या महिला विश्रांती कक्षाच्या उद्घाटन समारंभात पडसलगीकर अध्यक्षीय भाषणात बोलत होते. बुधवारी सकाळी राज्याचे पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी प्रथम पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यस्थेसंदर्भात विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी फे्रजरपुरा ठाण्यातील महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणाले की, राज्यातील सर्वच ठाण्यात महिला विश्रांतीगृह निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. अमरावतीच्या फे्रजरपुरा ठाण्यात महिलांसाठी विश्रांती कक्ष सुरू झाल्यामुळे महिला पोलिसांना चांगलाच फायदा होईल. पोलिसांची नोकरी धकाधकीची आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी विश्रांती कक्ष नाहीत, तेथे हा कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. या उद्घाटन समारंभाचे संचालन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी केले. यावेळी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस निरीक्षक, शांतता समिती, दक्षता समिती, मोहल्ला कमिटीसह गणमान्य नागरिक उपस्थित होते.
अमरावतीत आल्याचा आनंद पडसलगीकर यांचे अमरावतीशी जुनेच नाते आहे. ते म्हणाले की, १९८४ मध्ये मी अमरावतीत प्रशिक्षणार्थी कालावधीत सेवा दिली. त्यावेळची अमरावती आणि आताच्या अमरावतीत प्रचंड बदल घडला आहे. मात्र, या शहराशी परिचित असल्यामुळे मला आनंद होत आहे. त्यावेळी फ्रेजरपुरा ठाणे नव्हते, तर हा जगंल परिसर होता. अमरावतीत मिळालेल्या प्रेमापोटी मी येथे आलो; नागरिकांशी जवळीक साधण्यासाठी उपस्थित राहिलो, असे भावोद्गार त्यांनी काढले.
कम्युनिटी पोलिसिंगसाठी आढावा बैठकपोलीस महासंचालकांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी पाचही जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाºयांना आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिशानिर्देश दिले. समाजातील नागरिकांशी जवळीक व संवाद साधून कामे करा, 'सोशल व कम्युनिटी पोलिसिंग'वर भर द्या, असे पोलीस अधिकाºयांना सांगितले. आढावा बैठकीनंतर पडसलगीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातून प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्याचे प्रयत्न करू. शहर व ग्रामीण पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करू. पोलिसांच्या क्वार्टरला मंजुरी मिळाली आहे; ती लवकरात लवकरच व्हावी या दृष्टीने मी कामांना गती देईल, अशी ग्वाही डीजी पडसलगीकर यांनी दिली.