लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांत समाधानाचे वातावरण असले तरी हॉटेल, रेस्टॉरेंट व्यावसायिक मात्र नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील शेकडो हॉटेल, रेस्टॉरेंटचे संचालक एकवटले होते. यावेळी रेस्टॉरेंट ॲण्ड लाॅजिंग असोसिएशन, जिल्हा परमीट रूम असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधले. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेद देऊन हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ सकाळी ११ ते सांयकाळी ११ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. याचवेळी आंदोलकांनी आपल्या हॉटेल, रेस्टाॅरंटच्या चाव्या गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचेकडे सुपूर्द केल्या. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसापूर्वी ठराविक जिल्ह्यातील कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे सर्व निर्बंध ८ रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले. या निर्णयावर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हालाही रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आंदोलनात नितीन मोहोड, आशिष देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, नितीन कदम, नितीन देशमुख, गजानन राजगुरे, नितीन गुडधे, प्रवीण अळसपुरे, मदन जयस्वाल, नंदकिशाेर जयस्वाल, गुडू धर्माळे, नीलेश जयस्वाल, विशाल तरडेजा, पडाेळे, हर्षद देशमुख, अजय गुल्हाने आदी सहभागी झाले होते.
आजी-माजी लोप्रतिनिधींचा पाठिंबाजिल्ह्यातील हॉटेल, रेस्टाॅरेंट संचालकांनी व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी साठी शुक्रवारी आपल्या व्यवसाय बंद ठेवून हॉटेल, रेस्टॉरंटच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, युवा स्वाभिमानच्यावतीने खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी समर्थन दिले. शासनाने वरील व्यावसायिकांना वेळ वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दीड वर्षात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसानलॉकडाऊनमुळे दीड वर्षात हॉटेल रेस्टॉरंट. व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानदाराप्रमाणे सरकारने हॉटेल, रेस्टॉरेंट व लॉजिंग व्यावसायिकांचाही विचार करावा. वेळ वाढवून न दिल्यास नाईलाजाने आम्हाला अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा नितीन मोहोड, रविंद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, गुड्डू धर्माळे, नितीन कदम व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.