लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून संचारबंदीत शिथिलता देण्यात आलेली आहे. सर्व दुकाने, आस्थापनांना सोमवार ते शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तथापि, संसर्ग वाढू नये, याकरिता नागरिकांद्वारा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आवश्यक आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी जारी केले आहेत.या आदेशानुसार, सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य-पेय विक्रेते, पिठाची गिरणी, कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी यासह सर्व खाद्य दुकाने, दूध संकलन व वितरण केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तसेच शनिवार व रविवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा अनलॉक झाल्याने सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.लग्नात ५०, अंत्यसंस्कारास २० व्यक्तींनाच परवानगीलग्नसमारंभासाठी वधू, वर, आचारी व वाजंत्रीसह केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच परवानगी आहे. समारंभाची परवानगी मिळविण्यासाठी ‘संवाद’ संकेतस्थळावर जाऊन ‘इव्हेंट परमिशन’ या शीर्षकावर क्लिक करून अर्ज करावा. अर्जात माहिती भरल्यावर अर्जाची स्थिती याच संकेतस्थळावर तपासता येईल. अंत्यविधी कार्यक्रमासाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी आहे.- तर मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंडसार्वजनिक स्थळी मास्क नसल्यास ७५० रूपये दंड. सुरक्षित अंतर व दक्षतेचे नियम दुकानांत पाळले जात नसतील, तर दुकानदार किंवा आस्थापनेवर ३५ हजार रुपये दंड. मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी ५० हून अधिक व्यक्ती आढळल्यास मंगल कार्यालयाला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास हॉल चालकावर फौजदारीसह पुढील चार महिन्यांसाठी मंगल कार्यालय सील करण्यात येणार आहे.
उपाहारगृहांना ५० टक्के आसन क्षमतेची मुभाहॉटेल, उपाहारगृहे, खानावळ, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ पर्यंत एकूण ५० टक्के आसन क्षमतेसह व दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा पुरवू शकतील. शनिवारी व रविवारी उपाहारगृहांना घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. हॉटेल व लॉजिंगमध्ये ३३ टक्के निवास मर्यादा आली आहे.
शासकीय, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरूसर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याबाबत सूचना आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ण आसन क्षमतेसह व मालवाहतूक पूर्णवेळ करता येईल. सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, औषधालये पूर्णवेळ सुरू राहतील.
बिगर जीवनावश्यक दुकाने रविवारी बंदसर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक (शॉपिंग मॉलसह) दुकानांना सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत तसेच शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रविवारी ही दुकाने बंद राहतील.
हे राहणार बंद
- सर्व सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, बगिचे, उद्याने, खेळाची मैदाने ही कसरती, सायकलिंग, व्यायाम, धावण्यासाठी रोज रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहतील. सर्व आंतर मैदानी खेळ बंद राहतील. केवळ बाह्य मैदानी खेळांना मुभा राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
- सर्व चित्रपटगृहे व मॉल्समधील किंवा स्वतंत्र बहुपडदा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, पूजास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.