परतवाडा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८, तर केंद्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती दिली जाते. पण, अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कार्यरत एका रोजंदारी कर्मचाऱ्याला रोजंदारी सेवेतून वयाच्या ६३ व्या वर्षी सेवानिवृत्त करण्यात आले आहे.
नितीन पिंपळदे हे अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत १० डिसेंबर १९८६ रोजी रोजंदारी कर्मचारी म्हणून रुजू झालेत. २ मे १९८९ ला त्यांना कामावरून कमी केले. पण, न्यायालयाच्या आदेशानुसार १९८९ मध्येच परत कामावर घेतले गेले. बाजार समितीत कार्यरत कार्यालयीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादी ते सर्वात ज्येष्ठ ठरले. या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर ठेवले गेले.
१९८६ पासून कार्यरत असलेले नितीन पिंपळदे यांना कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी एका आदेशान्वये २२ एप्रिल २०२१ ला संस्थेच्या रोजंदारी सेवेतून तात्काळ प्रभावाने सेवानिवृत्त केले. त्यांनी वयाची साठ वर्षे २५ सप्टेंबर २०१८ रोजीच पूर्ण केल्याचे त्या आदेशात सचिवांनी स्पष्ट केले आहे. याकरिता आम्ही शाळेचा दाखला मिळविला असल्याचे सचिवांनी आपल्या आदेशात नमूद केले.
सेवानिवृत्तीचा या आदेशानंतर नितीन पिंपळदे यांनी १० डिसेंबर १९८६ पासूनची किमान वेतन फरकाची रक्कम, भविष्य निर्वाह निधीचा फरक व ग्रॅज्युटीच्या रकमेची मागणी अचलपूर बाजार समितीकडे केली आहे. या फरकाच्या रकमेचा धनादेश न मिळाल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही पिंपळदे यांनी बाजार समितीला दिला आहे.
दरम्यान, बाजार समितीकडून वाढविली गेलेली ही सेवानिवृत्तीची वयोमर्यादा चर्चेचा विषय ठरली आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतरही सलग तीन वर्षे बाजार समिती कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यास दिल्या गेलेल्या वेतनाची रक्कम कुणाकडून वसूल केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.