लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या जिल्हाभरातील सुमारे १ हजारांवर शिक्षक, शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगातील एक नव्हे, तर सलग तीन हप्त्यांची रक्कम सेवानिवृत्ती झाल्यानंतरही मिळालेली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त निवृत्ती शिक्षकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे निवेदन देवून न्याय देण्याची मागणी सोमवारी केली आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून आपला सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवृत्त होऊन चार ते पाच वर्षे लोटून गेले; परंतु सातव्या वेतन आयोगाद्वारे मिळणाऱ्या हप्त्याची पहिली रक्कम सोडली तर त्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथ्या हप्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. एवढेच काय तर गटविमा योजनेची रक्कम मिळालेली नाही. यामुळे हक्काचा पैसा मिळावा यासाठी सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांनी ही रक्कम मिळावी म्हणून प्रशासनाकडे सतत पत्रव्यवहार केला, निवेदनही दिले; परंतु पुढे काहीच नाही झाले. परिणामी, जिल्हाभरातील सेवानिवृत्त झालेल्या हजारावर शिक्षकांना सन २०१६ ते २०२३ पर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.
त्यामुळे वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, गटविम्याची रक्कमही थकीत आहे. ही रक्कम सुध्दा त्वरीत मिळावी आणि सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तिवेतन १ तारखेला मिळावे, आदी मागण्या आठवड्यात निकाली काढाव्यात, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्याम पाटी, दीपक मुळे, वासुदेव रेचे, संजय वानखडे, मनोहर चर्जन, दिलीप चौधरी, प्रभाकर देशमुख, राजू खारकर, प्रशांत गुल्हाने, इकबाल अहेमद, मो. शकील, अ. रहेमान, विनोद कुन्हेकर, पुंडलिक वितोंडे, सुरेंद्र वाडेकर, मारोती फुटाणे, सविता चर्जन, शीला उल्हे, नलिनी लंगडे, धनराज राऊत, दिनेश कनेटकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.