अमरावती : सासूकडून रिटायरमेंटचे सात लाख रुपये व चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊनही एकाने पत्नीला घराबाहेर काढले. तिच्या लहानग्या मुलीला मारहाण केली. ती छळमालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर त्या विवाहितेने १५ सप्टेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिचा पती अनंत भारदे, मदन हाडोळे, प्रवीण शिनकर, अतुल भारदे व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडित महिलेचे अनंत भारदे याच्याशी आर्य समाज मंदिरामध्ये लग्न झाले होते. त्या लग्नाला भारदे कुटुंबीयांचा विरोध होता. कालांतराने विरोध मावळल्यानंतर स्वागत समारंभ होऊन संसाराला सुरुवात झाली. काही दिवसांनंतर अनंतने तिला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. लग्नाच्या वेळी ती केवळ २० वर्षांची होती. त्यामुळे तिने सासरीदेखील शिक्षण सुरू ठेवले. मात्र, त्यावरून अनंत व एक महिला तिला टोमणे मारायची. दरम्यान, तिला दोन्ही मुलीच झाल्याने पतीव्यतिरिक्त अन्य काही आरोपींनी तिला टोमणे मारून मानसिक व शारीरिक त्रास दिला.
चारित्र्यावर संशय, मुलीला मारहाण
अनंतने नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्याने तिला जिवे मारण्याची धमकीदेखील दिली, तर उर्वरित सातही आरोपींनी तिला वारंवार फोन करून धमकाविले. आरोपी अनंतने स्वत:च्या मोठ्या मुलीस मारहाण केली, तर लहान मुलीला स्वत:च्याच आईविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न केला. लहान मुलीला अतुल भारदे व एका महिलेने मारहाण केली. दारूच्या नशेत त्याने आपल्याला अनेकदा शिवीगाळ केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.
प्लॉटमध्येही फसवणूक
छळ असह्य झाल्याने विवाहितेने आईला अवगत केले. मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आईने स्वत:च्या रिटारयमेंटमधून आलेले सात लाख रुपये आरोपी अनंतला दिले. पीडितेनेदेखील अनंतला सुमारे चार लाख रुपयांचे दागिने दिले. त्याने प्लाॅट दोघांच्या नावाने खरेदी केल्याची बतावणी केली, प्रत्यक्षात तो त्याच्या नावे झाला. त्यानंतरही त्रास न थांबल्याने अखेर तिने महिला सेल गाठले. मात्र, तेथे तडजोड न झाल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.