: फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
पान ३ चे लिड
फोटो पी ०८ परतवाडा र्गदी
परतवाडा : जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनची घोषणा होताच शनिवार ८ मे रोजी अचलपूर नगरपालिका क्षेत्रात सकाळपासूनच लोकांची एकच गर्दी उसळली होती. या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगसह पाळावयाच्या कोरोना नियमावली अक्षरशः पायदळी तुडविली गेली. कपडा विक्री करणाऱ्या दुकानदारांनी, शोरूमधारकांनी शहराला बहिरम यात्रेचे रूपच दिले आहे.
दुकानाचे शटर बंद ठेवून बाहेर दोन नोकरांना ते उभे ठेवतात. हे नोकर रस्त्याने जाणाऱ्या ग्राहकांना हेरून आवाज देतात. ग्राहक प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येताच त्या ग्राहकांना हळूच शटर वर करून दुकानात नेले जाते. दुकानात अपेक्षित ग्राहकांची गर्दी झाल्यास ते परत शटर बंद करतात. यात जवळपास एक ते दीड तास, कधी कधी तर दोन तास, तीन तास हे ग्राहक त्या दुकानात कोंडले जातात. कोंडलेले ग्राहक जोपर्यंत दुकानातून बाहेर सोडले जात नाहीत तोपर्यंत इतर ग्राहक आजूबाजूला गर्दी करून उभे असतात. यात त्या बाजार ओळीत चांगलीच गर्दी उसळते. वाहतूक जाम होते. एखादा सिनेमा सुटल्याप्रमाणे हे ग्राहक त्या कापड दुकानातून गर्दीने बाहेर पडतात. शहरात हा प्रकार खुलेआम सुरू आहे. यावर कोणीही नियंत्रण ठेवायला तयार नाही.
एवढ्यावरच ही गर्दी थांबली नसून, अचलपूर नगरपालिका क्षेत्रात महिना दोन महिने कोरोनाचा प्रसाद पुरेल एवढी ही गर्दी उल्लेखनीय ठरली आहे.
सकाळी आठ वाजतापासून उसळलेल्या या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता कुठेही प्रशासकीय यंत्रणा सक्रिय दिसून आली नाही. जाणून बुजून प्रशासकीय यंत्रणा या गर्दीकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र बघायला मिळाले. ११ वाजल्यापासून नगरपालिकेचे एक वाजता शहरात तेवढे धावताना दिसले. पण उसळलेल्या गर्दीला नियंत्रित करण्याकरिता या वाहनातून कोणीही खाली उतरले नाही. या वाहनातील गर्दीच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविणारी ठरली. तब्बल सात ते आठ लोक दाटीवाटीने या वाहनात बसून फिरत होते. गाडीतील काहींच्या तोंडाला मास्कही नव्हते.
बॉक्स १
दुकांनासमोर रांगा
दरम्यान शनिवारी भाजी बाजार, किराणा दुकानासह कापड दुकानात ग्राहकांची एकच गर्दी उसळली होती. ग्राहकांच्या रांगा त्याठिकाणी लागल्या होत्या. वस्तू खरेदी करिता ग्राहकांना प्रतीक्षेत ताटकळत बराच वेळ उभे रहावे लागत होते. ग्राहकांच्या पसंतीला वाव न देता यात काही दुकानदारांनी चढ्या दराने मालाची विक्री केली. नफाखोरीला ऊत आल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले.
भाजी विक्रेत्यांनी यात चांगले हात धुऊन घेतले. १० रुपये किलोचे टमाटे ४० रुपये किलोने विकले. ५ ते १० रुपये किलोचा सांभार २० रुपये भावाने विकला. १० ते १५ रुपये किलोप्रमाणे विकला जाणारा कांदा २५ रुपये किलोने विकला गेला. ग्राहकांना नाईलाजाने तो विकत घ्यावा लागला.