लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक अनिल टीव्ही या प्रतिष्ठानाच्या संचालकांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एक-दोन नव्हे, चक्क २२ टीव्ही लंपास केल्याची तक्रार परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यातील काही टीव्ही हस्तगत केल्याची माहिती आहे. प्रतिष्ठानचे संचालक जयसिंघाणी यांचे वास्तव्य लालपूल परिसरात सिंधी कॉलनी येथे आहे. अनेक वर्षांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या व्यवसायात असून, आपल्या राहत्या घरी, एका खोलीत ते इलेक्ट्रॉनिक्स साहित्य ठेवतात. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी त्या खोलीत ठेवलेले दोन टीव्ही जयसिंघाणी यांना दिसून आले नाहीत. संशय बळावल्याने त्यांनी पाळत ठेवली असता, घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एका युवकाला हाताशी धरून टीव्ही लंपास केल्याचे कबूल केले. अशा प्रकारे घरातून आतापर्यंत २२ टीव्ही चोरीला गेल्याची बाब जयसिंघाणी यांच्या लक्षात आली. चोरीला गेलेल्या या एका टीव्हीची किंमत १५-१६ हजार रुपये असताना, चोरणाऱ्या दोघांनी ते केवळ दोन ते तीन हजार रुपयात विकले. ज्यांनी हे चोरीचे टीव्ही घेतले होते, त्यांच्याकडून यातील काही टीव्ही हस्तगत करण्यात यश आले आहे. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने परतवाडा पोलीस ठाण्यात जयसिंघाणी यांनी ५ फेब्रुवारीला सायंकाळी ही माहिती दिली. त्यात मोलकरणीवर संशय व्यक्त केला. त्या आधारावर मोलकरीण महिलेसह एका युवकाला पोलिसांनी चौकशीकरिता बोलावल्याचे वृत्त आहे. घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात कुठलीही लेखी तक्रार वृत्त लिहिस्तोवर दाखल करण्यात आली नाही. चोरीला गेलेले टीव्ही हस्तगत होत असल्यामुळे जयसिंघाणी यांनी टीव्ही लंपास करणाऱ्यांप्रति मवाळ धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. दरम्यान, स्टॉक व्हेरिफिकेशन सुरू आहे. यानंतरच चोरीला गेलेल्या टीव्ही संचांचा निश्चित आकडा सांगता येईल, असे जयसिंघाणी यांनी स्पष्ट केले. परतवाडा पोलीस चौकशी करीत आहेत.
परतवाड्यात मोलकरणीने चोरले २२ टीव्ही, अल्पकिंमतीत विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:00 AM