अमरावती : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४८०० रुपये करण्याच्या मागणीसाठीे तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेद्वारा ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद करण्यात येणार आहे. या मागणीच्या अनुषंगाने संघटनेद्वारा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन बुधवारी शासनाला पाठविण्यात आले.
संघटनेद्वारा सन १९९८ पासून या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत असतांना शासनाद्वारा सहकार्य झालेले नाही, या अनुषंगाने झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले होते. बक्षी समितीचा अहवाल लागू करण्याचे आश्वासन देऊन मागण्यांवर विचार करण्यात आला नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये असंतोष असून आता ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद करण्यात येत असल्याने महसूल विभागाची यंत्रणा ठप्प होणार आहे.
या मागण्यांच्या अनुषंगाने विभागीय उपायुक्तांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष निता लबडे, कार्याध्यक्ष वैभव फरतारे, वैशाली पाथरे, सचिव अशोक काळीवकर, उपाध्यक्ष अरविंद माळवे, एम.टी धुळे, राजीव वानखडे, प्रवीण देशमुख, संजय मुरतकर, नरेंद्र कुरळकर, संध्या ठाकरे, श्याम देशमुख, विनोद वानखडे, प्रशांत देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.मागण्यांच्या अनुषंगाने संघटनेसोबत यापूर्वी चर्चा करण्यात आली व सध्याही सुरु आहे. बक्षी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री