आ. बोंडेंकडून ना. तहसीलदारास मारहाण : अटक होईस्तोवर आंदोलन सुरूच राहणारअमरावती : मोर्शी मतदारसंघाचे आ. अनिल बोंडे यांनी वरूडचे कार्यकारी दंडधिकारी व नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना ३० सप्टेंबरला घडली. या प्रकरणाच्या निषेधार्थ व आ. बोंडे यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्याची महसूल यंत्रणा ठप्प झाली. वरूड तहसील कार्यालयाचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांनी या योजनेचे १८० प्रकरणे निकाली काढले व त्रुटीअभावी १९० अर्ज प्रलंबित ठेवले. प्रकरणे प्रलंबित का? याची विचारणा करण्यासाठी आ. बोंडे कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यांनी ना. तहसीलदार काळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काळे यांनी वरूड ठाण्यात तक्रार दिली असता आ. बोंडे यांच्याविरोधात भादंविचे १८६० चे कलम अन्वये ३५३ व ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र आ.बोंडे यांना अटक केली नाही. त्यामुळे महसूल विभागात संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीदेखील आ. बोंडे यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांची खुर्ची बाहेर काढून तोडफोड केली, तर तहसीलदार राम लंके यांनाही अस्तित्व नसलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी दबाव टाकून शिवीगाळ केल्याचे प्रकार पूर्वी घडले असल्याचा आरोप महसूल संघटनांनी केला. या मारहाण प्रकरणात जोवर आ. बोंडे यांना अटक करण्यात येत नाही तोवर लेखणीबंद आंदोलन कायम ठेवण्यात येईल, असे महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेनी स्पष्ट केले. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांना देण्यात आले.यावेळी महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.माजी सैनिक संघटना आक्रमक मारहाण झालेले नायब तहसीलदार नंदकुमार काळे हे माजी सैनिक आहेत. माजी सैनिकांचा अनादर व मारहाण केल्याप्रकरणी आ. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना आमदार म्हणून अपात्र करावे अशी मागणी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेद्वारा शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी घोषणाबाजीने आ. बोंडेंचा निषेध केला.- तर अमरावती विभागात लेखणीबंदना. तहसीलदारांना मारहाण प्रकरणी आ. अनिल बोंडे यांना जर अटक केली नाही तर सोमवारपासून अमरावती विभागात लेखणीबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदार, नायब तहसीलदार, संघटनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष सुरेश बगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद
By admin | Published: October 02, 2016 12:10 AM