अमरावती : नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे यांनी सोमवारी अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. शहरासाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून कार्य करण्याच्या सूचना कंत्राटदार व संबंधित अभियंता यांना दिल्या आहेत.
कचरा व्यवस्थापना अंतर्गत बायोमायनिंग, प्रोसेसिंग ॲन्ड ट्रिटमेंट तसेच एस.एल.एफ. या कामाकरिता ही भेट होती. प्रिसॉर्टींग कंपोस्ट स्क्रीनिंग मशीनचा डेमो यावेळी दाखवण्यात आला. या मशीनद्वारे कचऱ्याचे रुपांतर खतात होणार आहे. काम पूर्ण क्षमतेसह त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या. नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा डी.पी.आर.च्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेने सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अकोली बायपास या ठिकाणी कार्यान्वित करण्याचे कार्य सुरू आहे. सदर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जमा कचऱ्यावर प्रक्रिया करणे, दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे, खत निर्मिती करणे, बायोगॅस प्लांट कार्यान्वित करणे, मटेरीयल रिकव्हरी फॅसिलिटी (एम.आर.एफ.), सॅनिटरी लँन्ड फिलिंग (एस.एल.एफ.) करणे, तसेच शहरातील प्रक्रिया न करता साठविलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे आदी कामाचा यामद्ये समावेश आहे.
यावेळी उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती राधा कुरील, सभागृह नेता सुनील काळे, उपआयुक्त अमित डेंगरे, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता मधुकर राऊत, श्रीरंग तायडे, श्यामकांत टोपरे, अभियंता सुधीर गोटे, लक्ष्मण पावडे आदी उपस्थित होते.