डेमो घरकुल उभारणार, नांदगाव पंचायत समितीची बैठक
नांदगाव खंडेश्वर : घरकुल योजनेसाठी ज्या लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही, अशा भूमिहीन लाभार्थींना विविध प्रकारात जागा उपलब्ध करण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना, गावठाण, ई-वर्ग, एफ-वर्गमधून तसेच ज्या लाभार्थींना रक्तनात्यातून जागा उपलब्ध होत असेल, अशा लाभार्थींची माहिती नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मार्गदर्शक होईल असे पंचायत समिती स्तरावर डेमो घरकुल उभारण्यात येणार आहे. या डेमो घरकुलाचे रेखांकन व भूमिपूजन पंचायत समितीमध्ये करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती वैशाली सचिन रिठे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता रायबोले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, पंचायत विस्तार अधिकारी संदीप देशमुख, कनिष्ठ अभियंता सुनील गोळे, आशिष मिश्रा, मनीष मदनकर, हितेश लांडे, विकी रत्नपारखी, व्यंकटेश दुरतकर, अक्षता जळीत, उमेश भोंडे, विजय अळणे, महेंद्र गांडोळे ही मंडळी उपस्थित होती.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ मध्ये ग्रामसभेतून प्राधान्य यादीमध्ये ४४०२ लाभार्थीचा समावेश होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात २०२०-२१ पर्यंत प्रपत्र ब मधील १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अपात्र लाभार्थींच्या रिमांडचे ठराव ग्रामपंचायतमध्ये विशेष मासिक सभा घेऊन १८ मार्चपर्यंत पंचायत समितीला सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत.