अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज या उपसा सिंचन योजनेच्या ३६१ कोटी ६१लाख रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कृषी सिंचनाबरोबरच पिण्यासाठी पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसायासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरणार असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पेढी उपसा सिंचन योजनेच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या कामाला गती मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत येणाऱ्या टेंभा गावाजवळून वाहणाऱ्या पेढी नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अमरावती तालुक्यातील ७ गावातील २,२३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ कृषी सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसाय यासाठी होणार आहे. जिल्ह्यात सिंचनाखालील क्षेत्र वाढून कृषी उत्पादकतेत भर पडावी, तसेच शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढून जीवनमान उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली