अमरावती : रेस्टारंट बारमध्ये ‘ये भाई का टेबल है, यहा से उठो ' वरून वाद उदभवल्यानंतर दिनेश गहलोत नामक आरोपीने एका तरूणावर कानशिलावर रिव्हॉल्वर रोखली. रहाटगावस्थित हाॅटेल सावजी रेस्टॉरंट ॲन्ड बार येथे १५ जून रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी शुभम राजेंद्र कचरे (२९, रा. खरेय्या नगर, महेंद्र कॉलोनी) याच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश प्रेमसिंग गहलोत (४७, रा. प्रभात कॉलनी) व पंकज रमेश पडोळे (४५, रा. गंगोत्री कॉलोनी, अकोली रोड, साई नगर) यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न, मारहाण व शस्त्र अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
शुभम कचरे हा मित्रासह गुरूवारी रात्री हॉटेल सावजी येथे गेले होते. तेथे त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. तेव्हा दिनेश व पंकज तेथे आले. पंकजने ' ये भाई का टेबल है, यहा से उठो ' असे शुभमला बजावले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा पंकजने शुभमला थापड मारली. त्यामुळे त्याचे डोके टेबलावर आदळले. वाद वाढू नये म्हणून शुभम मित्रांसोबत हॉटेलाबाहेर आले असता दिनेश व पंकज त्यांच्या मागे आले. तेव्हा दिनेशने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून शुभमच्या कानपट्टीवर लावली. त्यावेळी पंकजने ‘दिनेश उसको जाने दे ' असे म्हटले. तेव्हा दिनेशने ' पंकज तू बोल रहा है इसलिये जाने देता हू ' असे म्हणून ती रिव्हॉल्वर मागे घेतली. आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करत उशिरा रात्री नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रवीण काळे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून आरोपींना तत्काळ अटक केली.