- गजानन मोहोड अमरावती - महानुभाव पंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथून अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग जात आहे. या ठिकाणीच रेल्वे स्टेशनची निर्मिती करावी, अशी मागणी अ. भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत गोपीराज बाबा शास्त्री यांनी लावून धरली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सुचनेनूसार नागरिकांनी श्रमदानातून मातीचा प्लॅटफार्म तयार केला, आता या ठिकाणी आता आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर रेल्वे थांबणार आहे.प्रसिद्ध तीर्थश्रेत्र असल्यामुळेच रिद्धपूरला शासनाने ‘ब’ दर्जा दिला. रिद्धपूर या गावाच्या हद्दीत असतानादेखील कोळविहीर या गावाला रेल्वे स्टेशन बलविल्या गेले. श्रीक्षेत्र रिद्धपूरला देश-विदेशातील पर्यटक व भाविकांची सदैव गर्दी असते, येथे स्टेशन झाल्यास लगतच्या २० ते २५ गावांना फायदा होणार आहे. या खा. रामदास तडस यांचेसह महंत गोपीराजबाबा ७ मार्च २०१८ ला दिल्ली येथे जावून रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. ना. गोयल यांनी आश्वासन देऊन नागपूरच्या अधिकाºयांशी फोनवरून चर्च्चा केली व रिद्धपूर येथे रेल्वे स्टेशनला मान्यता प्रदान केली. नागपूरच्या अधिकाºयांनी जागेची पाहणी केली व ४०० मीटर लांबीचा प्लॉटफार्म निश्चित केला व मातीचा भराव घालण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्यात. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले तरी नागरिकांनी श्रमदान व लोकसहभागातून निधी गोळा केला व १३०० फूट लांब व २० फूट रूंद असा मातीचा प्लॉटफार्म तयार केला. २७ जुलै रोजी रिद्धपूरला आषाढी यात्रा आहे. या मुहूर्तावर रेल्वे थांबविण्याचा संकल्प खा. आनंदराव अडसूळ यांनी केला. नागपूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे प्रयत्न व महंत गोपीराज बाबा शास्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.
असे आहे रिद्धपूरचे महात्ममराठी साहित्याची गंगोत्री म्हणून श्री क्षेत्र रिद्धपूर ओळखल्या जाते. मराठीचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरीत्र’ येथे लिहिला गेला. यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक तथा दार्शनिक इतिहासाचे दर्शन या ग्रंथामधून होते. श्री गोमविंदप्रभूचे चरित्र आद्य मराठी कवयित्री महदंबेचे ‘धवळे’ हे काव्य या ठिकाणीच लिहिले गेले. महेश्वर पंडितांचे ‘ॠ षीपूर महात्मे’, नारायणव्यास बहाळिये यांचे ‘ॠ द्धीपूर वर्णन, कवी डिंभाचे ‘रिद्धपूर महात्म’, सारगंर्ध पुसदेकरांच्या ‘रिद्धपूर तीर्थमालिका’ आदी सुरस काव्यरचना रिद्धपूरचे वर्णन करतात. अमेरीकेचे डॉ. अॅन फिल्डहाऊस यांचे इंग्रजीमधील ‘ द डीड्स आॅफ गॉड इन रिद्धपूर हे पुस्तक अमेरिकेतील न्युयॉर्क येथून प्रसिद्ध झाल्याने रिद्धपूरची जगभर ओळख झाली. गोविंदप्रभुकालीन सात विहीरी आजही अस्तित्वात आहेत.