अमरावती : जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होताच आमदार रवी राणा यांनी दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठराव करावा अशी आग्रही मागणी केली होती. दरम्यान बैठकीतच सर्वांसमोर दोघांमध्ये तू-तू-मै-मै झाली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्याआधी रवी राणा यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भवनाच्या बाहेरच कुजलेलं सोयाबीन जाळत, संत्री, कुजलेलं सोयाबीन फेकून देत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर बैठक सुरू झाली असता यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
रवी राणा ऐकून घेण्यास तयार नसल्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. हळू आवाजात बोला असं सांगितलं, बोट दाखवून बोलू नका मी म्हणते, असं म्हणत त्यांनी पोलीस आयुक्तांना बोलवावे असे फर्मान सोडले. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यामुळे लगेच रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडले. यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं नाटक सोडून लोकप्रतिनिधींशी कस वागावं हे शिकावं असा टोला लगावला आहे. रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने जिल्ह्यात मात्र, चांगलीच चर्चा रंगली आहे.
या बैठकीनंतर बोलताना रवी राणा यांनी फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याची टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर शेतकरी मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाहीत असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी नियोजन सभेपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आ. रवी राणा यांच्या नेतृत्वात नियोजन भवनासमोर सोयाबीन जाळून शासन व प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यासोबतच संत्रा फळेही फेकण्यात आली. या आंदोलनादरम्यान वायएसपीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.