जीवघेणी स्टंटबाजी, उंचावरून डोहात उडी; वन विभागाने बंदी घातली, चोरमार्गांचा वापर
लोकमत एक्सक्लुसिव्ह
नरेंद्र जावरे - परतवाडा
उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या चिचाटी धबधब्यात निसर्गसौंदर्य न्याहाळण्यापेक्षा स्टंटबाज दारूडे हुल्लडबाज, पर्यटक जीवघेण्या कवायती करीत असल्याचे गंभीर चित्र आहे. वनविभागाने या परिसरात बंदी घातल्यानंतरसुद्धा चोरमार्गाचा वापर केला जात आहे.
श्रीनिधी प्रवीण सकळकळे (१६, रा. वृंदावन वसाहत गणेशनगर, साईनगर, अमरावती) हा विद्यार्थी त्याच्या कोचिंग क्लासने आयोजित केलेल्या सहलीत शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत आला असता चिचाटी डोहात १३ जुलै रोजी पाय घसरून पडल्याने बुडून दगावला. त्यासंदर्भात चिखलदरा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने येथील धबधबा टवाळखोर आणि हुल्लडबाज पर्यटकांच्या जीवघेण्या कवायतींचा अड्डा व त्यामुळेच अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे.
पावसाने पाणी शेकडो फूट उंचावरून जमिनीवर येत असल्याने चिचाटी गावानजीकचा हा धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. मोथा येथून वाहत येणारे पावसाचे पाणी या धबधब्यातून कोसळल्यावर जामुननाला नदीतून पुढे चंद्रभागा नदीचा विसर्ग होते व उंचावरून धबधबा कोसळतो. त्यामध्ये स्टंटबाजांच्या जीवघेण्या कवायती सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे.
बॉक्स
असा आहे चिचाटी मार्ग
मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत चिचाटी गावाचा समावेश आहे. परतवाडा चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढी येथून पिंपळखुटा, देवगाव, हिरदामल फाटा ते चिचाटीपर्यंत केवळ दहा किलोमीटरचा मार्ग असून, तेथून दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. कोरोना काळात या परिसरात वनविभागाने प्रवेश नाकारला होता. तथापि, तेथे उपस्थित वनमजुरांना धमक्या देऊन पर्यटक आत धबधब्याकडे जात असल्याचे पुढे आले आहे.
बॉक्स
पर्यटकांचा दारू पिऊन धिंगाणा, आवारा कुणी यांना
वन आणि व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणे गुन्हा आहे. परंतु, धबधब्यावर काही पर्यटक हुल्लडबाजी, दारू पिणे, धबधबा कोसळत असलेल्या उंच ठिकाणावर जाऊन डोहात उडी घेत स्टंटबाजी करणे, आंघोळीसाठी डोहात उतरणे आदी गंभीर प्रकार करतात. मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नी सिंग यांनी या ठिकाणी फलक लावून पर्यटकांसाठी हे ठिकाण बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे वनपाल अभिमान गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बॉक्स
थेट पायथ्याजवळ पोहोचू देणारा वॉटरफॉल
मेळघाटचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात लाखो पर्यटकांना भुरळ घालते. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले खळाळून वाहू लागतात. शेकडो फूट उंचावरून कोसळणारे धबधबे डोळ्याचे पारणे फेडणारे ठरतात. अशातच बोटावर मोजण्याइतक्या धबधब्यांमध्ये चिचाटी येथील धबधबा पाहता थेट पायथ्याशी पर्यटकांना बोलावणारा आहे. त्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी पर्यटक वननियमांची पायमल्ली करीत आहेत.
कोट
मेळघाट प्रदेशिक वनविभागांतर्गत घटांग परिक्षेत्रात चिचाटी धबधब्याचा समावेश आहे उपवनसंरक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार येथे पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. लवकरच तसे फलक लावण्यात येणार असून, उपस्थित वनमजुराला धमक्या देऊन दुसऱ्या मार्गाने प्रवेश होत आहे. अशांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- अभिमान गायकवाड, वनपाल, धामणगाव गडी
।