अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघावर नैसर्गिक न्यायसंगत रिपाइंचा (गवई गट) दावा असून, तो कायम आहे. महाविकास आघाडीकडे तसा प्रस्ताव दिला असून, समविचारी पक्षासोबत मैत्री व्हावी, याला प्राधान्य आहे. मात्र, या मैत्रीचा प्रस्ताव अमान्य झाल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, अशी भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून स्पष्ट केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व गवई गटाकडे आहे. सत्तेपासून धर्मांध शक्तींना दूर ठेवण्यासाठी रिपाइंने सातत्याने पुढाकार घेतला आहे. मात्र, महाविकास आघाडी रिपाइंला बाजूला ठेवत असेल तर आम्हालादेखील वेगळा निर्णय घेता येतो. मग, महाविकास आघाडी असो वा महायुती.
राजकीयदृष्ट्या निर्णय हा समविचारी पक्षांना घ्यायचा असल्याचे डॉ. गवई म्हणाले. राज्यात अमरावती, सोलापूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर व मुंबई अशा पाच लोकसभेच्या जागा लढविण्याची रिपाइंची तयारी आहे. महाविकास आघाडीने रिपाइंचा प्रस्ताव मान्य करावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा, एकला चलो अशी भूमिका राहील, असेही डॉ. गवई यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रिपाइंचे जिल्हाध्यक्ष हेमंत ढोले, अर्जुन खंडारे आदी उपस्थित होते.