अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत सहा अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचारी धास्तावले असून, तोकड्या मनुष्यबळामुळे कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे वास्तव आहे.
नोव्हेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होताच ‘विथहेल्ड’मध्ये निकाल असलेल्या विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे. हल्ली बी.एस्सी. सत्र ६ व ४ च्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मंगळवारी बीएसस्सी पर्यावरण विषयाचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन परीक्षा विभागाने चालविले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी कमी पाहावयास मिळाली. ऑक्टोबर ते डिसेंबर असे तीन महिने परीक्षा विभागाचे कामकाज निरंतरतेने सुरूच आहे. परंतु, ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सुरू होताच विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली. परिणामी दीड महिन्यात सहा अधिकारी, कर्मचारी कोराेना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे दिसून येत आहे. जी कामे महाविद्यालय स्तरावर होणे अपेक्षित असताना संपूर्ण ताण विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आला आहे. १४ डिसेंबर रोजी दोन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीती बळावली आहे.
--------------
- तर तीन दिवसांत गुणपत्रिका मिळणार
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात दस्तावेज जमा करावे. ही कागदपत्रे महाविद्यालयाने विद्यापीठात जमा केल्यानंतर तीन दिवसांत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका महाविद्यालयात पाठविली जाईल, असे पत्र परीक्षा विभागाने १४ डिसेंबर रोजी प्राचार्य, विभागप्रमुखांना पाठविले आहे.
----------------------
गत तीन महिन्यात विविध सहा परीक्षांचे नियोजन करण्यात आले. एकाच वेळी ९ ते १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. परीक्षा विभागात ४६ नव्याने अधिकारी, कर्मचारी मिळावे, यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे मागणी केली आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.
-----------------------