अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आजारातून बरे झाल्यावर काही रुग्णांत म्युकरमायकॉसिस आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. म्युकर मॉयकासिस हे एक प्रकारचा दुर्मिळ फंगल इन्फेक्शनचा आजार आहे. हा आजार मुख्यत: तोंडातील जबड्यात, नाकात व डोळ्यात आढळून आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा चार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
कोविडग्रस्त तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराची लवकर लागण होते. यासाठी रुग्णांनी शुगर लेवल नियंत्रणात ठेवणे व कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे. रुग्णांना डोकेदुखीचा त्रास, दृष्टी कमी होणे या डोळ्यांच्या आजारासह सायनस, तोंडातील वरच्या जबड्यात दुखणे व दातात पस होऊन दात हलणे, नाकामधून रक्तमिश्रित पस येणे, नाक बंद होणे आदी म्युकरमॉयकासिस आजाराची लक्षणे आहेत. या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर हा ४० टक्के आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कुटुंबात अशा पध्दतीचे फंगल इन्फेक्शन शरिरात आढळून आल्यास तत्काळ नाक, कान, घसा व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात नाक, कान, घसातज्ज्ञ श्रीकांत महल्ले यांनी एन्डोस्कोपीच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया केली. संजय खेरडे, बागवाले, स्वाती बाहेकर, के.जी. देशमुख, सुजित गांगोरे हे डॉक्टर्स त्यांच्या टिममध्ये सहभागी होते.
बॉक्स
फंगल इन्फेक्शन नाक, तोंडावाटे रुग्णाच्या शरीरात शिरकाव
इन्फेक्शन तोंडावाटे आणि नाकावाटे होत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे. हे फंगल इन्फेक्शन नाकावाटे व तोंडावाटे रुग्णाच्या शरिरात शिरते. म्युकरमॉयकासिस आजारात सायनसमध्ये तसेच डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊन त्याची तिव्रता मेंदूपर्यंत पोहोचते. फंगल हा रक्तवाहिन्यांच्या किंवा मज्जातंतूमधून आत शिरुन रक्तवाहिनीला ब्लॉक करतो व तेथील पेशींचा नाश करतो. यामुळे रुग्णाच्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते तसेच पॅरालिसिसही होऊ शकतो.