गजानन मोहोडअमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील मंत्रालयांतर्गत ४४० किमी. लांबीचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांत मार्गक्रमित होऊन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. यामुळे एक लाख चार हजार हेक्टर सिंचन क्षेत्रातवाढ, तर १२ साठवण तलावाद्वारे ८६० टीएमसी पाणीसाठाही वाढणार आहे.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदीजोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (एनडब्ल्यूडीए)द्वारा तयार करण्यात येत आहे. एकूण ४४० किमी लांबीचा हा जोड कालवा गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या तिरावरून सुरू होऊन त्याची संरेखा भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व अकोला या जिल्ह्यांतून मार्गक्रमित होणार आहे. शेवटच्या टप्प्यात हा प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पस्थळी सोडण्याचे नियोजन आहे.जलसंपदा विभागाच्या बैठकीत या जोड कालवा प्रकल्पाला अंशत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या ३०८ किमीच्या जोड कालव्याचे सर्वेक्षण एनडब्ल्यूडीएद्वारा पूर्ण झालेले आहे. या जोड कालव्याची अमरावती जिल्ह्यात लांबी ९० किमीची आहे. यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाजवळ ५० किमीची लिफ्ट प्रस्तावित आहे, तर २३८ ते ४४० किमी दरम्यानची लांबी अकोला व बुलडाणा जिल्ह्यात आहे. यामध्ये काटेपूर्णा प्रकल्पाजवळ २७ मीटर उंचीची लिफ्ट राहणार आहे. अमरावतीच्या जिल्ह्यात आठ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. या तलावामध्ये ४६२ टीएमसी साठवण होऊन ७८ दलघमी साठ्याच्या माध्यमातून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २०२ किमी लांबीच्या अंतरात सहा साठवण तलावातील ३९६.३७ दलघमी साठ्याच्या माध्यमातून ३४ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.३०८ किमी लांबीचे संरेखा सर्वेक्षण पूर्णराष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, हैदराबादद्वारा साखळी क्रमांक ३०८ किमीपर्यंतच्या जोड कालव्याचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४४० किमीपर्यंत म्हणजेच नळगंगापर्यंतच्या संरेखाला मुख्य अभियंत्याच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. जोड कालव्याच्या बाजूला असणा-या कालव्यामधून उपलब्ध होणा-या पाण्याचा वापर रबी सिंचनासाठी साठवण तलाव निर्माण करण्यासाठी होणार आहे.केंद्राच्या अखत्यारीतील हा नदीजोड प्रकल्प पश्चिम विदर्भासाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची चर्चा रविवारी ना. नितीन गडकरी यांच्याशी झाली. प्रकल्पाची किंमतवाढ झाल्याने यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.- निवेदिता चौधरी,प्रदेश सचिव, भाजप
नदीजोड प्रकल्पाने एक लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ, हैदराबादच्या एनडब्ल्यूडीएचा सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:02 PM