८० फुटांचा मार्ग गेला कुठे? महावितरणच्या डीबीचे अतिक्रमण, अपघाताची शक्यता
अमरावती : कठोरा नाका ते विजय कॉलनीचा रस्ता शासकीय औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयाच्या परिसरात जवळपास गायब होऊन त्याची बोळ झाली आहे. येथून ये-जा होत असलेल्या वाहनांची वर्दळ पाहता, अपघाताची शक्यता आहे. ती दूर करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
कठोरा नाका ते विजय कॉलनीकडे जाणारा ८० फुटांचा रस्ता फार्मसी महाविद्यालयाच्या कोपºयावर अवघ्या २० फुटांचा झाला आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी यादरम्यान रपटा न टाकता साधी नाली काढण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे गोळा झालेले पाणी या रस्त्यावर थबकते. या रस्त्यात मध्येच महावतिरणची डीबी उभारण्यात आली आहे. याशिवाय काही ठिकाणी पेव्हर टाकण्यात आले आहे.
कठोरा परिसरातून जाणाºया तीन राज्य मार्गांना जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. फार्मसी महाविद्यालयामागील हा रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची सदोदित शक्यता राहते. त्यामुळे हा रस्ता रुंद करण्यात यावा तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठा रपटा टाकला जावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या समस्येमुळे वाहनचालक वळसा घालून कठोरा मार्गावर येतात. अप्रोच रस्त्यावर मध्येच नालीला पाणी वाहून नेणारे झाकण ठेवले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असा अनिल देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांचा आक्षेप आहे.