श्यामकांत पाण्डेयलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहराला लागून असलेल्या सर्वे नंबर १३२ म्हणजेच तलाई कॅम्प हे मौजा दिया अंतर्गत येणाऱ्या तलाई गावाचा ले-आऊट झालेला भाग. परंतु, या भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते, नाली, पाणीपुरवठा पाईपलाईन नसल्यामुळे सुशिक्षितांच्या या क्षेत्रात सर्वच वंचितसारखे राहत आहेत. सर्व्हे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे हरिहरनगर हे खासगी ले-आऊट असून, तेथे ग्रामपंचायत दियामार्फत कोट्यवधी रुपयांची अवैधरीत्या विकासकामे करण्यात आली आहेत. हरिहरनगरमध्ये खासगी अभिन्यासधारकाने रस्ते व नालीचे बांधकाम करणे आवश्यक होत. मात्र, तलाई कॅम्प भागातील शासकीय लेआउटमधील विकासनिधी वेळोवेळी हरिहरनगरमध्ये पळविण्यात आला. याची चौकशी होणे गरजेचे आहे. येथील प्राध्यापक कॉलनी थोडीफार विकसित झाली आहे. एक-दोन रस्ते या भागात दिसून येतात. मात्र, उर्वरित सर्वे नंबर विकासापासून पूर्णपणे वंचित आहे. या भागात अनेक गर्भश्रीमंतांनी बांधकाम करताना स्वत:ची जागा पूर्णपणे बांधून आजूबाजूतील रस्ते व गल्लीतसुद्धा अतिक्रमण करून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे अनेकांना ये -जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी सर्वे नंबर १३५ चा वाद चव्हाट्यावर आला होता. तेथील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
परस्पर विक्रीचा आरोपसर्वे नंबर १३२ लगत उत्तरेकडे वासुदेव खार्वे यांचे शेत होते. कालांतराने ती शेती अशोक खारवे यांच्या नावे करण्यात आली. अशोक खार्वे यांनी धारणी तालुक्यातील सर्वात पहिली अकृषक आणि खासगी ले-आउट निर्मित केले. असे करताना पूर्ण भूखंड विक्री केले. त्यानंतर उत्तरेकडील काही शासकीय भूखंड अवैधरीत्या विक्री केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. याचीसुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे.
सर्वे नंबर १३२ मध्ये गैरप्रकार घडले. या सर्व गैरप्रकारांची लवकरच चौकशी करण्यात येऊन प्रसंगी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल. - दुर्गा बिसंदरे,सदस्य, ग्रामपंचायत, दिया