पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
फोटो - हरकुट १६ पी
चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. रस्त्यावर मोठ खड्डे तयार झाल्याचे पाहावयास मिळत असून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.
शहरातील मुख्य मार्गापैकी एक बस स्थानक ते बेलोरा चौक मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिक दररोज या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँक, शासकीय कार्यालये, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते.
वर्षभरापासून या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने नगारिकांना येथून ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रकार दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळापासून सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. आजघडीला या रस्त्यावरील खड्ड्यामधील पाण्याची स्थिती पाहून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
-----------
काही दिवसांपूर्वीच टाकला होता मलबा
बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. वाहतूक सुरू असताना खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मलबा टाकला होता. परंतु, आजघडीला परिस्थिती ''जैसे थे'' च आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.