उभ्या वाहनांमुळे होतात अपघात : अवैध दारुचीही विक्रीसुनील देशपांडे अचलपूरजुळ्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवैध ढाब्यांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत सर्वाधिक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला.रस्त्यांना आणि महामार्गांना लागून शहराबाहेर अनेक ढाबे निर्माण झाले आहेत. त्यातील अनेकांना परवाने नाहीत. काहींना केवळ खानावळीचा परवाना असताना तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होत असते. तसेच बहुतांश ढाबे रस्त्याला लागूनच असल्याने त्या ढाब्यांच्या जवळपास कितीतरी जड वाहने तासन्तास उभी राहतात. यातील राज्य महामार्ग चिखलदरा रोड, बहिरम रोड, अंजनगाव रोड, रासेगाव रोड आदी रस्त्यांवर अहोरात्र वाहनांची वर्दळ असल्याने रात्री मागून येणारी वाहने या जड वाहनांवर आदळण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा मोठे अपधात होऊन प्राणहानीसुद्धा झाली आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या ढाब्यांवर मद्यप्राशन केल्यानंतर मद्यपी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर आल्यास भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने अनेकदा त्यांना उडविण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील कित्येक प्रकरणे आपसात मिटविली गेल्याने त्याची नोंद पोलिसात होऊ शकली नाही, अशी माहिती आहे. अचलपूर परतवाडा परिसरात ५० ते ६० ढाबे आहेत. त्यातील बहुतांश रस्त्याला लागूनच आहेत. या मार्गावरील काही ढाब्यांना अन्न प्रशासन विभागाची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे विनापरवाना बिनधास्तपणे सुरु आहेत. काही ढाब्यांवर पोलिसांच्या आशीर्वादाने अवैधरीत्या दारूची विक्री व मादक पदार्थाची सर्रास छुप्या मार्गाने विक्री होत असल्याची चर्चा आहे. काही ढाब्यांचे संचालक गुंड प्रवृत्तीचे असून पोलिसांशी त्यांचे साटेलोटे आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. एखाद्याने आवाज उचलल्यास त्याला बेदम मारहाण करून पद्धतशीरपणे पोलीस कारवाईत अडकविले जात असल्याने कुणीही त्यांच्याविरुध्द 'ब्र' काढण्याचे धाडस दाखवीत नाही.काही दिवसांपूर्वी एका ढाबा संचालकाचा आणि जेवणासाठी आलेल्या दोन व्यक्तींचा पैशांच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा त्या दोघांना ढाबे संचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम चोपले होते. ते काही वेळ त्याच्याच ढाब्याबाहेर बेशुद्ध पडले होते. ते दोघेही मद्यधुंद असल्याने पोलिसात जाऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे या ढाब्यावरअवैध दारू विकली जात असून या ढाबे संचालकाला अभय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुप्तचर यंत्रणेमार्फत ढाब्यांवर तपासणी केल्यास सारा प्रकार उजेडात येईल, असे जनतेचे म्हणणे आहे.
रस्ते, महामार्गांवर अवैध ढाब्यांचा सुळसुळाट
By admin | Published: June 15, 2016 12:30 AM