अमरावती : गत काही वर्षांपासून विदर्भात रस्ते अपघातात वाघ, बिबट, काळवीट, हरिण आदी अन्य वन्यजीवांचे बळी जात असल्याच्या घटनांमुळे वनविभागापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय महामार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचा प्रस्ताव असून, त्याअनुषंगाने रस्त्यांची चाचपणी सुरू झाली आहे.राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र हे विदर्भात आहे. त्यापैकी बहुतांश वनक्षेत्र हे राष्ट्रीय व राज्य महामार्गामध्ये विभागले आहे. पेंच, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सुमारे २०० कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग पसरलेला असून, ताडोबा, चिमूर, भद्रावती, ब्रम्हपुरी व बोरमध्ये राज्यमार्ग गेला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात वन्यजीव बाघ, बिबट रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाखाली येऊन चिरडतात. विदर्भातील वनक्षेत्रातून जाणाºया रस्त्यावरून वन्यजीवांचा बळी हा रात्रीच्या सुमारास जातो, हे विशेष. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वनक्षेत्रातून जाणाºया रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अपघात प्रवणस्थळी रेडियम, पांढरे पट्टे, नामफलक व गतिरोधक बसविण्याबाबत आदेश जारी केले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाकपणा करीत असल्याचे चित्र आहे. गुळगुळीत रस्ते ठेवण्याच्या प्रयत्नात वनक्षेत्रातील मार्गावर वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. नागपूर ते गोंदिया हायवे, हिंगणा रिंग ते चिमूर राज्यमार्गावर अनेकदा बिबट, वाघांचा अपघातात मृत्यू झाला. वनक्षेत्रातून जाणाºया राज्य राष्टÑीय महामार्गावर गतिरोधक बसविणे, पांढरे पट्टे मारणेबाबत त्या-त्या भागातील स्थानिक वनाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्यांच्याकडे निधी नसल्याची ओरड ऐकण्यास मिळते. अनेक ठिकाणी गतिरोधक न बसविता निधी मात्र खर्च केल्याचे दाखविले जाते. व्याघ्र संपर्कात प्राधिकरणाच्या नियमावलीचा भंग सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसून येते.
तर रात्रीच्या वेळी मार्ग बंदकाही वर्षांपासून रस्ता अपघातात वन्यप्राणी ठार होत असल्याने केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक राज्य शासनाने रात्रीच्या वेळी महत्त्वाचे मार्ग बंद करण्यासंदर्भात वनविभागाला चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणारे रस्ते रात्रीच्या काही तासांकरिता टप्प्या- टप्प्याने बंद करण्यात येत आहे. मात्र, याला विरोध होत असल्यामुळे राज्य शासन हे तसे प्रयत्न करण्यास अपयशी ठरत आहे. वनक्षेत्रात दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळी प्राणी पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडणार नाही, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
निसर्ग साखळीत वन्यजीव अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रस्ते अपघातात वन्यजीवांचे बळी जात असतील तर ते रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी सुरू आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर