पुसला : गावातील रहदारीचे मुख्य रस्ते खड्ड्यात गेल्याने रस्त्यावर चिखल साचला आहे. नागरिकांना व दुचाकीस्वारांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावातील मुख्य रस्त्याचे अर्धवट बांधकाम झाले असून, मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर चिखल साचलामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अपघाताची शक्यतादेखील या रस्त्यामुळे वाढली आहे.
पुसला हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, या गावातील मुख्य रस्त्याची अलीकडेच दयनीय अवस्था झाली आहे. गावातील पुनवर्सन भागातील रस्ते, रंगारपेठ ते बस स्थानक व आठवडी बाजार ते ग्रामपंचायत या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम टप्प्याटप्याने होत असून, या रस्त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास कायमच आहे. रात्रीला अंधार असल्याने या रस्त्यावर चालणे कठीण आहे. आठवडी बाजार ते ग्रामपंचायत या मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण असून, या रस्त्यावर चिखल व खड्डे पडले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची तीव्र नाराजी पसरली आहे. या रस्त्याचे तुकड्यात बांधकाम होत असून रस्त्यावर खड्डे व चिखल साचल्याने अपघात होण्याची भीती कायम दुचाकीस्वारांमध्ये राहते.