प्रदीप भाकरे, अमरावती: लग्नाचे आमिष देऊन एका तरूणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र ज्यावेळी तिने लग्नासाठी तगादा लावला त्यावेळी त्याने तो मी नव्हेच’चा पवित्रा घेत नकार दिला. त्या नकाराने नखशिखांत हादरलेल्या त्या तरूणीने अखेर अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तथा आरोपीविरूध्द तक्रार नोंदविली.
याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ३१ मार्च रोजी रात्री आरोपी अमित अशोक येवतकर (रा. अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार व तोतयेगिरी करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. ऑक्टोबर २०२० पासून आरोपीने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे पिडिताचे म्हणणे आहे. तक्रारीनुसार, तरूणीची आरोपी अमितशी जून २०२० मध्ये भेट झाली. हळूहळू ओळख घट्ट होऊन दोघांमध्ये प्रेम बहरले. सोशल मिडियावर दोघांमध्ये संवाद घडून आला. दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये आरोपीने तिला आपण लग्न करणार आहोत, अशी बतावणी केली. तिला लग्नाचे आमिष दिले. त्यातून त्याने प्रथम बुलढाणा येथे तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने अनेकदा तिचे सर्वस्व लुटले.लग्नास नकार
अलिकडे पिडिताने आरोपी अमित येवतकर याला लग्नाबाबत विचारणा केली. तो टोलवाटोलव करत असल्याचे लक्षात येताच तिने त्याला लग्नासाठी तगादा लावला. मात्र त्याने तिच्या मनाचा काडीमात्र विचार न करता लग्नाला थेट नकार दिला. आरोपीने आपली शारीरीक, मानसिक फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने ही बाब कुटुंबियांच्या कानावर घातली. अखेर तिने धाडस करत ३१ मार्च रोजी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"