अमरावती : छत्रीतलाव परिसरात इव्हनिंग वॉकला गेलेल्या तरुणाला लुबाडल्याची धक्कादायक घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास उघड झाली. अज्ञात चार आरोपींनी त्याच्या दुचाकीसह मोबाईलदेखील पळविला. एकनाथपूरम बागेजवळ ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी त्या १७ वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात चाैघांविरूद्ध भादंविचे कलम ३९२, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
चैतन्य कॉलनी परिसरातील मनकर्णानगर येथे राहणारा १७ वर्षीय तरुण १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी एमएच २७ बीके ५८३० या दुचाकीने छत्री तलाव परिसरात फिरण्यास गेला. तेथे दुचाकी पार्क करून तो आरोपींच्या वाहनावर बसला. त्यादरम्यान अज्ञात आरोपींनी त्याला दुचाकीवरून उठ, असे दरडावत शिवीगाळ केली. त्यामुळे तो तेथून आपली दुचाकी घेऊन निघाला.
चारही आरोपींकडून पाठलाग
तो तरुण छत्री तलाव परिसरातून बाहेर पडला. त्यावेळी त्या चौघांनी त्यांच्याजवळील दोन दुचाकीने त्याचा पाठलाग केला. तथा एकनाथपूरम परिसरातील उद्यानाजवळ त्याला गाठले. त्याच्याकडील २० हजार रुपये किमतीची दुचाकी व ५ हजार रुपयांचा मोबाईल, असा ऐवज हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी रात्री ११.१५ च्या सुमारास चारही अज्ञातांविरूद्ध वाटमारी, मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदिवण्यात आला.