परतवाडा : अकोट शहरात मंगळवारी घडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर परतवाडा, अचलपूर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांना पोलिसांनी सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. लसीकरणाचे पथक सांगून घरात शिरतात व लुटमार करून पळून जात असल्याने या टोळक्यापासून सावध राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
अकोट येथे मंगळवारी शहरात दुपारी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरी पाच-सहा जणांचे टोळके लसीकरणाची माहिती विचारण्यासाठी आले. संबंधित व्यापाऱ्याच्या नातीने संशय येताच त्यांना ओळखपत्र मागितले. दरोडेखोर महिलांनी घरात शिरकाव केल्यानंतर पुरुषांच्या साहाय्याने घरातील सदस्यांना मारहाण केली व बांधून ठेवले. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर तोंडात बोळे कोंबून चिकटपट्टी लावण्यात आली. खिडकीतून आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना सोडविण्यात आले. तोपर्यंत हे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यावरूनच परतवाडा, अचलपूर शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर व पोलीस विभागाने केले आहे.
बॉक्स
संशयित दिसताच पोलिसांना द्या माहिती
अकोटच्या घटनेची परतवाडा शहरामध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. संशयित दिसताच पोलिसांना माहिती द्या व घरात शिरणाऱ्या अशा लोकांचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढून ठेवा, असे आवाहन चांदूर बाजार पोलिसांनीदेखील केले आहे.