पान २ बॉटम वीज खांबाचा फोटो घेणे
प्रशांत काळबेंडे - जरूड : दरमहा येणाऱ्या महावितरणच्या देयकांमध्ये प्रत्यक्ष वीजवापरासोबत अनेक आकार आणि व्याज लागून येत असल्याने ग्राहकांना बिले अव्वाच्या सव्वा वाढून येतात. त्याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो. बिल भरा, अन्यथा वीज कापू, अशी भीती दाखविली जाते. प्रत्यक्ष वीज वापरासोबत प्रत्येकी १०० रुपये स्थिर आकाराच्या रूपाने ग्रामीण भागासाठी बिलात जोडले जातात, तर शहरी भागासाठी हा आकार ११० रुपये आहे.
साधारणपणे मार्च २००१७ मध्ये ५५ रुपये असलेला स्थिर आकार ऑक्टोबर २०१८ मध्ये ८० आणि मार्च-एप्रिल २०२१ पासून १०० रुपये ग्रामीण भागासाठी व ११० रुपये शहरी भागासाठी आकारण्यात येत आहे. आता त्यात वहन आकार युनिटमागे १.१८ रुपये दर युनिटसाठी आकारला जात आहे. त्यामुळे वीज बिलात एकूण ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरमहा कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आकार वाढवून महावितरण अक्षरशः दिशाभूल करीत आहे व वीज ग्राहकांना त्याकडे मुकाटपणे पाहावे लागत आहे.
महावितरणच्या ग्राहकांसाठी ही अचानक केलेली वाढ कंबरडे मोडणारी असून कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्यांना परवडणारी आहे का, याचा विचार शासनाने करायलाच हवा. मंदिर उघडण्यासाठी घंटानाद करणाऱ्या विरोधी पक्षांनी खरे तर वीज बिलासंदर्भात शासनाला धारेवर धरून वीज बिलावर लादण्यात आलेले अतिरिक्त अधिभार रद्द करण्यासाठी नक्कीच घंटानाद करायला हवा, अशी वरूड तालुक्यातील जनसामान्यांमध्ये चर्चा आहे.
कोरोनाकाळात मदतीऐवजी लुटमार
दोन वर्षांपासून कोरोनाकाळात अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना दोन वेळची भूक भागविणे कठीण झाले. अशा कुुटुंबांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. वीजमंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत विज बील माफ आणि कारोनाकाळातील विज बिलात सवलतीची घोषणा केली होती.
---------------------
असा वाढला वीज बिलात स्थिर आकार
स्थिर आकार रुपये
मार्च - २०१७ ५५.००
एप्रिल - २०१७ मध्ये ५९.००
मे - २०१७ ६०.००
एप्रिल - २०१८ ६२.००
मे - २०१८ मध्ये ६५.००
ऑक्टोबर - २०१८ ८०.००
मार्च - २०२१ १००
-----------------------