युवकांचे परिश्रम वाया, पुनर्वसनाची जागा चुकली
अनिल कडू
परतवाडा : रोहीच्या शुश्रुषेनंतर त्याचे जंगलात सोडताना भौगोलिक परिस्थितीचे भान राखता न आल्याने त्याचा मृत्यू झाला आणि युवकांचे परिश्रम वाया गेल्याची घटना नुकतीच घडली.
प्राप्त माहितीनुसार, पथ्रोट येथील काही युवकांना जखमी रोही आढळला. त्यांनी त्याला परतवाडा येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांकडून त्यावर दोन दिवस उपचार करून घेतले गेले. ज्या पिंजऱ्यात त्याला ठेवले, तेथे राखण करताना डासांचा चावा युवकांनी झेलला. चार लिटर सलाईन त्या रोहीला एकाच वेळी चढविले गेले. आवश्यक औषधोपचार केल्यानंतर तो रोही पायावर उभा झाला. नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले गेले. वनकर्मचाऱ्यांनी धारणी रोडवरील पिकनिक पॉईंटवर त्याला सोडले. यानंतर तो तेथील दरीत उतरला. तेथे तो अस्वस्थ झाला. वन्यजीवप्रेमींचे पिकनिक पॉईंटला लक्ष गेले तेव्हा तो रोही मरणासन्न अवस्थेत त्या दरीत त्यांना आढळून आला. वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने वन्यजीवप्रेमींनी त्याला खांद्यावर उचलून त्या दरीतून स्ट्रेचरच्या मदतीने बाहेर काढले. परतवाड्यात उपचाराला प्रतिसाद न देता रोही दगावला.
जागा चुकली अन् जीव गेला
पिकनिक पॉईंट ही जागा वन्यजीव सोडण्यास योग्य नाही. या ठिकाणी दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. या ठिकाणी सर्पमित्र पकडलेले साप वन्यजीव विभागाच्या मदतीने सोडत असतात. सपाट शिवारातून आलेल्या रोहीची दऱ्याखोऱ्यातील भागासाठी खुरे मजबूत नसतात. त्यामुळे त्यांना सपाट भागातील अधिवासातच सोडावयास पाहिजे होते, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.