अमरावती : ग्रह-ताऱ्यांवर आधारित नक्षत्रनिहाय पावसाचा अंदाज वर्तविणे,ही भारतीयांची पूर्वापार परंपरा आहे.भारतीय पंचांग शास्त्राने देशातील चार महिन्यांच्या पावसाळ्याची, एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. त्याप्रमाणे नक्षत्रनिहाय ग्रह-ताऱ्यांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तविण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्यानुसार पावसाचे पहिले महानक्षत्र म्हणजे ‘रोहिणी’ नक्षत्र. पावसाच्या या पहिल्या "रोहिणी" नक्षत्राला आज २५ मेपासून सुरुवात होत आहे.
पावसाळ्यापूर्वीच येणाऱ्या या पहिल्या महानक्षत्राचे वाहन ‘मोर’ असून दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे. सूर्याच्या नक्षत्र प्रवेशावेळी एकही जलकारक ग्रह,जलराशीत नसल्याने या नक्षत्रात कमी पावसाचे योग दर्शविते. या नक्षत्रात उष्णतामान वाढून,सायंकाळच्या सुमारास धुळीची वादळे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच काही भागात वारा वादळासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रोहिणी नक्षत्रासोबतच आजपासून ‘नवतपाला’ सुरवात होत आहे. त्यामुळे हे नव दिवस सर्वाधिक तापमानाचे राहण्याची शक्यता आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानामध्ये सतत बदल होत राहिला.कधी अवकाळी वादळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे उन्हाळा फारसा जाणवला नाही; परंतु घाम फोडणाऱ्या "नवतपाला" आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस चांगलेच "ताप"दायक असणार हे नक्की.
कारण उन्हाळ्यात सर्वात जास्त तापणारे दिवस,असा नवतपाचा लौकिक आहे.या दिवसात हवा व जमिनीचे उष्ण तापमान सर्वात जास्त असते. नवतपाच्या या नऊ दिवसांचा संबंध पुढे येणाऱ्या, पावसाच्या नऊ नक्षत्रांसोबत जोडलेला आहे. जर नवतपाचा कालावधी ठरल्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला तर त्यावर्षी पाऊस उत्तम बरसतो. या उलट नवतपाच्या नऊ दिवसात ज्या दिवशी तापमान कमी असेल तसेच गारवा किंवा पाऊस पडल्यास, त्या दिवसाच्या संबंधित पावसाचे नक्षत्र कोरडे जाते किंवा त्या नक्षत्रात पाऊस कमी पडतो. असा जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज आहे. नवतपाच्या दिवसनिहाय येणारी पावसाची नऊ नक्षत्रे पुढीलप्रमाणे आहेत. मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा,हस्त ही ती नऊ नक्षत्रे आहेत.