अमरावती : कार्यशाळा व अग्निशमन विभागाकरिता कंत्राटी वाहनचालक पुरविण्यासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती सचिन रासणे यांनी शुक्रवारी दिली. यापूर्वीच्या कंत्राटात ६७ वाहनचालकांचे वेतन चार महिन्यांपासून झालेले नाही. त्यामुळे त्याच कंत्राटदाराचा विचार न करता शाॅर्ट टर्म निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक शुक्रवारी दुपारी झाली. बैठकीपश्चात सभापतींनी माध्यमांना ही माहिती दिली. याकंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या. याशिवाय महापालिकेत वेळोवेळी पुरविल्या जाणाऱ्या पोकलॅन्ड व जेसीबी यंत्रसामग्रीच्या करारास पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या अवधीत कामे न झाल्यास पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे रासणे म्हणाले.
महापालिका क्षेत्रात अमनपामार्फत होणाऱ्या पाच लाखांवरील विकासकामांकरिता नेमलेल्या त्रयस्त तपासणी परीक्षण संस्थेला कामबंद असल्याने मुदतवाढ नाकारण्यात आलेली आहे. याशिवाय ग्रीन जीम साहित्य खरेदीसाठी फेरनिविदा काढण्यात येणार अासल्याचे त्यांनी सांगितले.