अमरावती : राज्यात व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाल्यानं शासन चिंतेत आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील मार्ग बदलण्याचा प्रस्ताव असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीनं (एनटीसीए) सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेषत: महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांकडे लक्ष केंद्रीय करण्यात आलं आहे.एनटीसीएनं देशभरातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांकडे जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागितली आहे. या मार्गामुळे आतापर्यंत अपघात झालेल्या वन्यप्राण्यांची आकडेवारी नमूद करण्याचे निर्देश क्षेत्रसंचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील पेंच, ताडोबा, मेळघाट, बोर अभयारण्य, सह्याद्री, टिपेश्वर आदी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रसंचालकांनी त्याअनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एनटीसीएच्या सर्वेक्षणानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत रस्ते आणि रेल्वे अपघातात तीन ते चार लाख वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांचं संवर्धन, संरक्षण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग येणाऱ्या काळात बाहेर इतरत्र ठिकाणाहून नेले जातील, याचे हे संकेत मानले जात आहेत. जंगलातून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग जात असल्यानं वाघांच्या शिकारीसाठी ते धोकादायक असल्याच्या निष्कर्षाप्रत एनटीसीए पोहोचली आहे. परिणामी राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचा यासंबंधी सर्वेक्षण अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयात सादर केला जाणार आहे.
बफर झोनमधील रस्ते धोकादायकताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन असलेल्या मध्य चांदा विभाग, चंद्रपूर वनविकास महामंडळातून जाणारा रस्ता, तर मूल- चंद्रपूर, बल्लारशा-चंद्रपूर ही रेल्वे लाइन वन्यप्राण्यांसाठी अतिशय धोकादायक असल्याचं मत वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मेळघाटातून मध्यप्रदेशकडे, नवेगाव बांधमधून रायपूरमार्गे छत्तीसगड, सह्याद्री अभयारण्यातून कोल्हापूर, गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी घातक ठरणारा आहे.
व्याघ्र प्रकल्पांबाहेरील पर्यायी मार्ग सुचवावे लागणारव्याघ्र प्रकल्प अथवा जंगलातून जाणारे मार्ग, रस्ते बदलण्याचा प्रस्ताव पाठवताना व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांना पर्यायी मार्ग सुचवावे लागणार आहेत.. वाघ, बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भविष्यात हे मार्ग जंगलातून जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.