लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधीक्षकांचे पत्र बडनेरा रेल्वे स्थानकात धडकले आहे.गत लोकसभा अधिवेशनात रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या आणि प्रवाशांची असुरक्षितता या विषयांवर भावना गवळी, आनंदराव अडसूळ व संजय धोत्रे आदी खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धावत्या गाड्यांमध्ये दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा मांडताना, प्रवासी असुरक्षित असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली होती. लोकसभेत झालेल्या चर्चेच्या परिणामी रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाय योजले आहेत.रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ यंत्रणेकडे प्रवाशांचीदेखील सुरक्षितता सोपविण्यात आली आहे. अन्य सहकार्यासाठी राज्याचे लोहमार्ग पोलीस असतील. बडनेरा, अमरावती स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाला वरिष्ठांकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदूकधारी जवान प्रवाशांची सुरक्षा करतील. बडनेरा ते अकोला आणि पुढे अकोला ते भुसावळ अशा दोन टप्प्यांत सशस्त्र जवान धावत्या गाड्यांमध्ये राहतील. तीन ते चार आरपीएफ जवानांचे एक पथक यामध्ये नेमले जाईल. अलीकडे रेल्वेत अल्पवयीन मुलांकडून मोबाइलसह साहित्य लंपास करण्यात आल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आरपीएफ पथकाला हे मोठे आव्हान आहे. यापूर्वीदेखील आरपीएफकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेची धुरा होती. आता यात वाढ केली जाणार आहे.अवैध खाद्यपदार्थ विक्रीला बसणार लगामरेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खाद्यपदार्थ विक्री होते. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या बंदूकधारी आरपीएफ पथकामुळे यात बराच फरक पडणार आहे. आरक्षित डब्यात हे पथक सुरक्षा देईल. कोणी प्रवासी विनाआरक्षण आढळल्यास त्याला रोखण्याचे अधिकार बहाल केले आहेत. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह तृतीयपंथीयांचा हैदोसदेखील आता थांबण्याचे संकेत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीसुद्धा आरपीएफ होते. आता यात अधिक वाढ होणार आहे. प्रवाशांसह रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पथक गठित केले जाणार आहे.- राजेश बढे,निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा.
रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या रोखण्यासाठी आरपीएफचे विशेष पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:54 AM
रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.
ठळक मुद्देबंदूकधारी शिपायांची गस्त : लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लक्ष