अमरावती: दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले यांच्या वाढदिवसाला आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी किडलेल्या बोंडांचा हार भेट करीत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहण्याचे आश्वासन आमदार बुंदिले यांनी दिले.
रमेश बुंदिले यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या अंजनगावच्या राजहंस कॉलनीतील घरी आप्तेष्ट व कार्यकर्त्यांचा राबता होता. भाजपाचे पदाधिकारी व अंजनगावचे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळ आदी उपस्थित असताना अचानक रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. त्यांच्या हाती कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे किडलेल्या बोंडांची माळ होती. पोलिसांनी त्यांना रोकून धरले. गोंधळ निर्माण होत असतानाच रमेश बुंदिले यांनी ‘येऊ द्या’ अशी हाक दिली. बुंदिले यांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडून बोडांच्या माळेसह निवेदन स्वीकारले. शासनाने बोंडअळी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश निर्गमित केले असून मतदारसंघातील १०० टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगितले. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रभाकर वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस अभ्यंकर, सुमेध सरदार, अरविंद तायडे, सागर रायबोले, हिंमत रायबोले, पंकज येष्टे, संघर्ष मोरे, रत्नदीप रायबोले, मंगेश इंगळे आदी उपस्थित होते.
हेक्टरी ७० हजारांची मदत करा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोंडअळीने नुकसानीचे सर्वेक्षण करावे व कापूस उत्पादकांना हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही केली.