पत्रपरिषद: राजेंद्र गवई यांची माहितीअमरावती: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार आहे. विशेषत: बौद्धेत्तर उमेदवारांना प्राधान्य देत रिपाइं सोशल इंजिनिअरींग हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिली. युती, आघाडीत बिघाडी झाल्यानंतर रिपाइं स्वबळावर निवडणूक लढविणार ही बाब गवर्इंनी स्पष्ट केली. गवर्इंच्या मते, जिल्ह्यात काँग्रेससोबत मैत्री करण्याची तयारी होती. मात्र जागा वाटपात समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तोवर आता स्वबळावर लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सुमारे १५० उमेदवार रिंगणात राहतील. रिपाइं हा केवळ बौद्धांचा पक्ष आहे, हा कलंक मोडीत काढण्यासाठी बौद्धेत्तर ७० टक्के समाजाला उमेदवारी देण्याचे प्राधान्य आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेससोबत मैत्री होईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने नोटाबंदी करुन सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. याचा परिणाम सर्वच स्तरावर झाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये नक्कीच भाजपला फटका बसेल, असे संकेत त्यांनी वर्तविले. पदवीधर मतदार संघासाठी अद्यापपर्यत कोणत्याही उमेदवाराला रिपाइंने पांठीबा जाहीर केला नाही. परिस्थितीनुसार पदवीधरसाठी निर्णय घेतल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला रामेश्वर अभ्यंकर, हिमंत ढोले, भाऊ ढंगारे, नगरसेवक भूषण बनसोड, अर्जुन खंडारे, सविता भटकर, अमोल इंगळे, रमेश आठवले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिपाइंचे सोशल इंजिनिअरिंग
By admin | Published: January 28, 2017 12:22 AM