पंधरवड्यातीलदुसरी घटना : अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल परतवाडा : जवर्डीनजीकच्या आर.आर जिनिंगला बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागून संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. यात कोट्यवधी रूपयांचा कापूस व यंत्रसामुग्री नष्ट झाली. अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वी याच कारखान्याला आग लागली होती. परतवाडा-अमरावती मार्गावरील जवर्डीनजीकच्या खासगी औद्योगिक वसाहतीमध्ये राजकुमार अग्रवाल यांचा आर.आर. जिनिंग प्रोसेस हा कारखाना आहे.बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एका कापसाच्या गंजीतून धूर निघण्यास सुरुवात झाली. लवकरच आगीने रौद्र रूप धारण केले. यात संपूर्ण कापसाच्या गाठी व कारखान्यातील यंत्रसामुग्री बेचिराख झाली. पंधरा दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विद्युततारेच्या घर्षणामुळे आगीची ठिणगी पडून येथे ठेवलेल्या कापसाच्या तीन गंज्यांनी पेट घेतला होता. यात कोट्यवधींचा कापूस नष्ट झाला होता. बुधवारी पुन्हा लागलेल्या आगीची चर्चा होत आहे. घटनास्थळी दहा बंबआर.आर जिनिंगला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अचलपूर, अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, आकोट, चांदूरबाजार, चिखलदरा येथूून फायरब्रिगेड बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी चार तासांत याआगीवर नियंत्रण मिळविले. आगीची माहिती मिळताच तहसीलदार मनोज लोणारकर, नायब तहसीलदार राजेंद्र काळे, अचलपूरचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरात खळबळ आर.आर. अग्रवाल यांच्या जिनिंगला लागलेली आग विझविण्यासाठी जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या १० गाड्या व कर्मचारी बोलाविण्यात आले होते. यामुळे सायरनचा आवाज शहरात घुमत असल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या गाड्यांना शहरातील अतिक्रणाचा सामना करावा लागला. महत्प्रयासाने आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. शॉटसर्किटची शंका असली तरी आगीचे खरे कारण कोणते, याचा तपास केला जाईल. फायर आॅडिट करण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्या आहेत.- मनोज लोणारकर, तहसीलदार
आर.आर.जिनिंगला आग; कोट्यवधींची हानी
By admin | Published: April 06, 2017 12:05 AM