प्रदीप भाकरे , अमरावती: अजित १५५ या कापुस वाणाची (बियाण्याची) ज्यादा दराने व छुप्या पध्दतीने विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकाला कृषी विभागाने ट्रॅप केले. १२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास जुना कॉटन मार्केटस्थित नितीन कृषी केंद्रात ही कारवाई करण्यात आली. तेथून अजित १५५ या कापुस वाणाची दहा पॅकेट जप्त करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक सागर डोंगरे (४९) यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी १२ जून रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास आरोपी निलेश राजकुमार अग्रवाल (४८, रा. अमरावती) याच्याविरूध्द फसवणूक व बियाणे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
नितीन कृषी केंद्राचा संचालक निलेश राजकुमार अग्रवाल याला ८६४ रुपये एमआरपी असलेले अजित १५५ या कापूस वाणाचे ४७५ ग्रॅम वजनाचे पॅकेट थेट १८०० रुपयांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे कृषी विभागाने ही कारवाई डमी ग्राहक पाठवून यशस्वी केली. नितिन कृषी केंद्रातून अजित १५५ या वानाची छुप्या पध्दतीने व ज्यादा दराने विक्री होत असल्याची माहिती सागर डोंगरे यांना मिळाली होती. त्याआधारे जिल्हास्तरिय भरारी पथक प्रमुख मल्ला तोडकर, कृषी उपसंचालक उज्वल आगरकर, मोहिम अधिकारी प्रविण खर्चे, कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर व सागर डोंगरे यांनी त्याबाबत सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. कोतवालीतील हेकॉ दिपक श्रीवास व अंमलदार नरेंद्र उघडे व पंचांसोबत नितीन कृषी केंद्राजवळ पोहोचले.
डमी ग्राहकांनी दिले नऊ हजार रुपयेदोन डमी ग्राहकांना नितीन कृषी केंद्रात ९ हजार रुपये घेऊन पाठविले. त्यावेळी तेथील निलेश अग्रवाल याने अजित १५५ या कापूस बियाणाची प्रति पॅकेट किंमत ८६४ रुपये असताना १८०० रुपये अशा दामदुप्पट दराने नऊ हजार रुपये घेऊन पाच पॅकेट डमी ग्राहकाला दिले. त्याचे बिल देखील दिले नाही. त्याचवेळी डमी ग्राहकाने इशारा करताच पथक दुकानात पोहोचले. सर्वप्रथम गल्ल्यातील डमी ग्राहकाने दिलेले ९ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान अजित १५५ या वाणाचे आणखी पाच पॅकेट व ग्राहकाला दिलेले पाच असे एकुण १० पॅकेट जप्त करण्यात आले.